आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; रेल्वे सर्वेक्षणाचा फार्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे मंत्रालयाने यावर्षी अर्थसंकल्पात नव्या कामांना प्राधान्य न देता जुन्या, रखडलेल्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात सुरू असलेल्या रेल्वे मार्गाला गती यावी यासाठी निधीची तरतूद केल्याचे दाखवले आहे.  नव्या मार्गांना मंजुरी मिळालेली नसल्यामुळे महाराष्ट्रात रेल्वे जाळ्यांचे विस्तारीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच काही मार्गाचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठीची तरतूदही केली आहे. यात यापूर्वीच सर्वेक्षण झालेल्या मार्गांचाही समावेश असल्यामुळेे मूळ मागण्या आणि अपेक्षांना पाने पुसत केवळ सर्वेक्षणाचा फार्स आखल्याचे दिसत आहे. 


दोन वर्षांपूर्वीपर्यंत रेल्वे मंत्रालयाचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर व्हायचा. रेल्वेमंत्री या माध्यमातून रेल्वेच्या जमाखर्चाचा तपशील सादर करायचे. या वेळी नवे मार्ग, नव्या गाड्या, नव्या योजना, भाववाढ यासंदर्भातील तपशीलवार माहिती सर्वसामान्यांना मिळायची. पण नंतर देशाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसंदर्भातील ठळक मुद्दे आणि आर्थिक तरतुदी सांगितल्या जातात. नंतर या तरतुदीच्या आधारावर वेगवेगळ्या विभागात काय होणार हे रेल्वेचे संबंधित अधिकारी जाहीर करतात. त्यामुळे सर्वसामान्यांना रेल्वे पुढच्या वर्षभरात नेमके काय करणार याची जुजबी माहिती मिळते. गेल्या वर्षीच्या घोषणांचे नेमके काय झाले याचा कोठेही उल्लेख नसतो.  


२०१७-१८ चा रेल्वे अर्थसंकल्प पहिल्यांदा मुख्य अर्थसंकल्पातून सादर झाला त्या वेळी तो १ लाख ३१ हजार कोटींचा होता. या वेळी ३५०० किलोमीटरचा रेल्वेमार्ग बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. २०१९ पर्यंत सर्व कोचमध्ये बायोटॉयलेटची सुविधा, अनेक रेल्वेस्थानकावर सरकते जिने आणि लिफ्ट बसवल्या जाणार, तीर्थक्षेत्रासाठी गाड्या सुरू करणार, असे सांगण्यात आले होते.  


या वर्षीच्या अर्थसंकल्पातील ठळक तरतुदीत एकीकडे रेल्वेचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर असल्याचे सांगितले. त्यासाठी १ लाख ४८ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली. सोबतच देशभरातील ६०० स्थानकांचे आधुनिकीकरण, मोफत वायफाय आणि सीसीटीव्ही, मानवरहित ४२६७ रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करणार, ३६०० किलोमीटरचे ट्रॅक नव्याने तयार करणार, ४ हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, १८ हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, अशा काही कामांचा समावेश आहे. या सगळ्या हजारो किलोमीटरच्या आणि करोडो रुपयांच्या योजनेत महाराष्ट्राच्या वाट्याला ठळक असे काहीही आलेले नाही. अपवाद फक्त मुंबईचा आहे. तेथे सीएसटी पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर झाला असून त्यासाठी ५४ हजार ७७६ कोटी रुपयांची तरतूद तेवढी  केलेली आहे. उर्वरित कामात अहमदनगर-बीड-परळी या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या मार्गासाठी ४२५ कोटी, अमरावती-नरखेड मार्गासाठी १८ कोटी, वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ मार्गासाठी ३७९ कोटी, पुणे-नाशिक मार्गासाठी १० कोटी, भुसावळ-जळगाव तिसऱ्या मार्गासाठी ५० कोटी, नवीन रुळांसाठी ८०० कोटी अशा जुन्याच कामांना गती देण्यासाठीची तरतूद आहे. यातील एकही योजना नवी नाही. वर्षानुवर्षे मागणी असलेल्या नव्या मार्गांबाबत कोणतेही ठोस धोरण रेल्वेच्या संकल्पात नाही 


नगर-बीड-परळी मार्गाचे काम १६ वर्षांपासून सुरू आहे. इतक्या वर्षांत आतापर्यंत केवळ १६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजे वर्षाला १ किलोमीटरचे काम होणार असेल तर २५० किलोमीटरचा हा मार्ग पूर्ण व्हायला किती वर्षे लागतील हा मोठा प्रश्न आहे. अशीच परिस्थिती इतर मार्गांची आहे. यात केवळ नवीन मार्गाच्या सर्वेक्षणाला तरतूद करणे. त्यातही ज्या मार्गाचे सर्वेक्षण आधीच झालेले आहे त्यांचेही सर्वेक्षण दाखवणे हा फार्स नाही तर काय आहे? 


भारतीय रेल्वेने दररोज १ कोटी ६० लाख प्रवासी प्रवास करतात तसेच दररोज १४ लाख टन मालाची वाहतूक होते. देशाच्या रेल्वेचे जाळे हे ६६ हजार ६८८ किलोमीटर एवढे आहे. त्यापैकी राज्यात केवळ ६१२७ किलोमीटरचा समावेश आहे. देशाच्या एकूण रेल्वे जाळ्यांपैकी राज्यातील रेल्वेमार्गाचे प्रमाण अवघे ९.२ टक्के आहे. राज्यातील रखडलेल्या रेल्वे मार्गाला गती मिळावी यासाठी काही वर्षांपूर्वी राज्याने रेल्वेमार्गाच्या कामाचा आर्थिक वाटा उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्याने रेल्वेसोबत करार केले. खर्चाचा काही टक्क्यांचा भार राज्य शासनाने उचललेला आहे. तरीही रेल्वेच्या राज्यातील विकासाला चालना मिळताना दिसत नाही. वर्षानुवर्षे त्याच त्या रखडलेल्या मार्गांची चर्चा होते. नव्या मार्गाच्या अपेक्षा वर्षानुवर्षे तेथेच आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात त्यांच्या वाट्याचा रेल्वेला द्यायच्या निधीची तरतूद झाली नाही तर पुन्हा रखडलेल्या मार्गांचे काम आणखी रखडण्याचा धोका आहे. 


- सचिन काटे, कार्यकारी संपादक, अकोला

बातम्या आणखी आहेत...