आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : असंवेदनशीलतेचा कळस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहिरीत पोहायला उतरल्याच्या कारणावरून मातंग समाजाच्या दोन अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून मारहाण केल्याचा प्रकार जामनेर तालुक्यातील वाकडी येथे १० जून रोजी घडला. दोन दिवसांनंतर या मारहाणीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा हा प्रकार त्या मुलांच्या कुटुंबीयांना कळाला. पीडित मुलाच्या आईने पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झाले. तसेच त्या दोघांना अटकही झाली. तत्पूर्वी गावातील काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत हा वाद आपापसातच मिटवण्याचा प्रयत्न केला.

 

पोलिस गुन्हा दाखल करून घेत नाहीत अशी कुटुंबीयांची तक्रार होती. गावातील काही नागरिकांनी पुढाकार घेऊन पोलिस ठाणे गाठले तेव्हा पुढची प्रक्रिया झाली. अल्पवयीन मुलांना विवस्त्र करत मारहाण करणे या घटनेचे चित्रीकरण करणे, ते व्हायरल करणे हा प्रकार धक्कादायक आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. या महाराष्ट्राला आणि अख्ख्या माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. मात्र समाज अशा घटना पाहून संवेदनशीलता दाखवत नाही हे त्याहून अधिक गंभीर आहे.   


एखादी घटना समोर आली की प्रत्येक जण त्याकडे आपल्या फायदा-तोट्याच्या हिशेबातून पाहतो. राजकीय पक्ष आणि नेते त्यात आघाडीवर आहेत. अशा घटनांबाबत ते राजकीय दृष्टिकोनातून पाहतात आणि त्यानुसार धोरण ठरवतात. अशा घटनांचा निषेध केला जातो. दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विरोधक, विशेषत: सत्ताधाऱ्यांना या घटनेला जबाबदार धरत त्यांच्यावर आरोप केले जातात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लगेच या घटनेचा निषेध करताना ‘आज मानवताही शेवटचे श्वास मोजत आपली अस्मिता वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, आरएसएस-भाजपच्या या विषवल्लीच्या राजकारणाविरोधात जर आम्ही आज आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही,’ असे म्हटले आहे.

 

अशोक चव्हाण यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याच्या आशयाचे वक्तव्य केले असून काँग्रेसचे शिष्टमंडळ तेथे भेट देणार असल्याचे सांगितले आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी घटनेचा निषेध करत शांततेच्या आवाहनासाठी त्या गावाला भेट देणार असल्याचे तसेच मुख्यमंत्रीही तेथे भेट देणार आहेत असे  सांगितले आहे. अनुसूचित जाती-जमातींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. तो सगळ्यांनी मिळून सोडवायला हवा. या प्रश्नाचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पण या विषयावरून येत असलेल्या या आणि  अशा प्रतिक्रिया या प्रातिनिधिक आहेत. त्यात मूळ प्रश्नाबाबत संवेदनशीलता दाखवण्याऐवजी त्याचे खापर कोणावर तरी फोडण्याचा जास्त प्रयत्न केला जातो. केवळ प्रतिक्रियांवर हा प्रकार थांबणार नाही. त्या गावात भेटी दिल्या जातील. यातून हा प्रश्न सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून सोडवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत का?   


एखादी अमानवी घटना घडली की कायदा आणि सुव्यवस्था आणि ते सांभाळणारे संबंधित हे टार्गेट केले जातात. गुन्हेगारी ही प्रवृत्ती असते. सगळ्याच प्रकारचे गुन्हे वर्षानुवर्षे घडत आलेले आहेत. असे अमानुष गुन्हेही अधूनमधून उघडकीस येतात. पण सगळ्याच ठिकाणी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. गुन्हेगारावर जरब बसवण्यास आपली यंत्रणा कमी पडतेय का, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गुन्हे सिद्धतेचे प्रमाण हा पण मोठ्या चर्चेचा विषय आहे. या संदर्भात वादविवाद आहेत. अशा घटनांच्या बाबतीत सगळ्याच धक्कादायक बाब म्हणजे समाजाची संवेदनशीलता कमी होत असल्याचे प्रत्येक प्रकरणात समोर येत जाते. गुन्हेगार किंवा ज्यावर अन्याय झाला आहे, तो कोणत्या जाती-जमातीचा आहे हे आधी पाहिले जाते. त्यानंतर त्याच्याबद्दल काय भूमिका घ्यायची हे ठरवण्याचे प्रकार घडत आहेत. अलीकडे त्यात वाढही होत आहे.

 

या प्रकरणात शेत जोशींचे आहे हे समोर आल्यानंतर थेट दलित-सवर्ण अशा पद्धतीने प्रकरण समोर आणले गेले. पण मारहाण करणारा हा स्वत: वेगळ्या जातीचा आहे हे समोर आले. या वादात अनुसूचित जाती-जमाती आणि भटक्या-विमुक्तांतील लोक आहेत हे स्वत: रामदास आठवलेंनी स्पष्ट केले आणि प्रकरणाची तीव्रता अचानक कमी होत चालल्याचे चित्र निर्माण झाले. हा प्रकार असंवेदनशीलतेसोबतच सामाजिक सौहार्द बिघडवणारा आहे. कोणतीही वाईट घटना घडली तर मानवतेच्या दृष्टीने पाहिली जावी. ती पुन्हा होऊ नये यासाठी सगळ्या समाजाने संवेदनशीलता दाखवली तरच या प्रकाराला लगाम बसू शकतो. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 

- सचिन काटे

कार्यकारी संपादक, अकोला

बातम्या आणखी आहेत...