आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत गजानन महाराजांंची पालखी आज पंढरपूरकडे होणार रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राजेश्वराच्या नगरीत दोन दिवसांचा मुक्काम करुन श्री गजानन महाराजांची पालखी शनिवारी पहाटे पुढच्या मुक्कामासाठी येथून रवाना होईल. गुरुवार, शुक्रवार दोन दिवस पालखीचा अकोल्यात मुक्काम होता. शहर तसेच परिसरातील भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दोन्ही दिवस संतश्रेष्ठांच्या वास्तवाने शहर दुमदुमले. 


शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता बाजोरिया विद्यालयातून पालखी निघाली. मुख्य डाकघर, धिंग्रा चौक, टॉवर, रतनलाल प्लॉट चौक, सिव्हिल लाईन, नेहरू पार्क चौक, इन्कमटॅक्स चौक, आदर्श कॉलनी येथे पोहोचली. दुपारी आदर्श कॉलनीत पालखीचा विसावा होता. तिथे प्रसादाचे वितरण करण्यात आले. तेथे भाविकांनी मोठ्या संख्येत दर्शन घेतले. वाटेमध्ये श्री गजानन महाराजांच्या मूर्ती, प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भाविकांनी ठिकठिकाणी प्रसाद, शीतपेय, पाण्याची व्यवस्था केली होती. आदर्श कॉलनीतून सिंधी कँप, दक्षतानगर चौक, अशोक वाटिका, जिल्हाधिकारी कार्यालय, सरकारी बगिचा, खाेलेश्वर, सिटी कोतवाली चौक, लोखंडी पूल, जयहिंद चौक, किल्ला, हरिहर पेठेतून पालखी टाऊन हायस्कूलमध्ये पोहोचली. या ठिकाणी महा प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी पहाटे पालखी वाडेगावच्या दिशेने येथून प्रस्थान करेल. २३ जून रोजी दुपारी भरतपूर आणि त्यानंतर वाडेगावला पालखीचा मुक्काम राहणार आहे. २४ रोजी देऊळगाव, पातूर येथील मुक्काम आटोपून श्रींची पालखी वाशीम जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. अकोला शहरामध्ये श्री गजानन महाराज पालखी स्वागत समितीचे अध्यक्ष शिवलाल बोर्डे आणि सहकाऱ्यांनी उत्तम व्यवस्था ठेवली होती. 


'श्रीं'ची पालखी आणि पावसाचे आगमन 
अकोला आणि परिसरामध्ये पावसाचा खंड पडल्याने काळजीचे वातावरण होते. परंतु श्री गजानन महाराजांची पालखी आली की पाऊस येईल ही श्रद्धा होती. झालेही तसे. बुधवारी रात्री चांगला झाला. गुरुवारी सकाळी अकोल्याच्या रस्त्यांवर पाणी साचले होते. वरुणराजानेही पालखीचे स्वागत केले. 

बातम्या आणखी आहेत...