आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांच्या घरी धुणी भांडी करून पुष्पाने उत्तीर्ण केली दहावीची परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- वडिलांच्या निधनानंतर एकट्या आईला कुटुंबाचा सांभाळ करणे अवघड गोष्ट, नववीपर्यंत शिक्षण घेऊन २००७ मध्ये लग्न झाले, पतीची पण आर्थिक स्थिती तशी बेताचीच, त्यामुळे रात्र शाळेत खिचडी बनवण्याचे काम सुरू केले, दोन मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देतानाच सासूच्या प्रोत्साहनाने पुन्हा पुस्तक, पेनाशी गट्टी जुळवली आणि ११ वर्षांच्या विश्रांतीनंतर आज दहावी उत्तीर्ण केले. ही चित्रपट किंवा मालिकेची कथा नाही तर हे करून दाखवले आहे, पुष्पा घुट्टे- कांबळे यांनी. जागृती रात्र शाळेत खिचडी बनवणाऱ्या पुष्पा यांचे ११ वर्षांपूर्वी सुटलेले शिक्षण पुन्हा सुरू झाले आहे. 


खरप रोड येथील पंचशील नगर मध्ये राहणाऱ्या पुष्पा नंदु घुट्टे यांचे २००७ मध्ये नववीचे शिक्षण झाले आणि लग्न झाले. पती रोहित कांबळे हे हॉटेल मध्ये वेटरचे काम करत असून, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची, त्यामुळे पुष्पा ताईंनी जागृती रात्र शाळेत शिपाईचे काम, खिचडी बनवण्याचे काम सुरू केले. सासू, सासरे, नणंद, दीर, दोन मुलं अशा एकूण ८ सदस्यांच्या कुटुंबात राहणाऱ्या पुष्पा ताईंचा मोठा मुलगा सहावीत तर लहान मुलगा दुसरीत शिकतो. मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देताना स्वत: दहावी पूर्ण कर असे प्रोत्साहन सासू तारा रवी कांबळे यांनी पुष्पा ताईंना दिले. ज्या शाळेत खिचडी बनवतो तेथेच दहावीचे शिक्षण का घेत नाही, असा सल्ला शाळेतील शिक्षिका प्रिया वखरे यांनी देखील त्यांना दिला. या सर्व प्रेरणेतून त्यांनी रात्र शाळेत दहावीचा अभ्यास सुरू केला. 


दिवसा ५ घरी धुणी भांडीचे काम करून रात्री शाळेत अभ्यास करायचा, असे करताना पुष्पा ताईंनी अनेक वेळा परीक्षेला बसत नाही, शाळेतून नाव काढून टाका म्हणून हट्ट देखील केला. २००७ मध्ये सुटलेले शिक्षण आज ११ वर्षांनंतर पुन्हा अभ्यास करणे तसे त्यांना अवघडच गेले. तरी त्यांनी हार न मानता दहावीची परीक्षा दिली आणि त्या ३४.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. ११ वर्षांनंतर पुस्तकांशी जुळलेली मैत्री आता अशीच ठेवून पुढील शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस आहे. शिक्षण घेण्यासाठी, शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते हे २६ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण होणाऱ्या पुष्पा ताईंनी सिद्ध करून दाखवले आहे. 

बातम्या आणखी आहेत...