आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचपदासाठी कागदोपत्री पोटच्या मुलांना दाखले मयत, दोन्ही मुले शाळेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पातूर तालुक्यातील पहाडसिंगीचे सरपंच प्रेमदास जानू पवार यांनी जिवंत असलेल्या आपल्या दोन मुलांचे मृत्यूपत्र सादर करून, मुलीचे मृत्यू पत्र मिळण्यासाठी थेट न्यायालयात अर्ज करून ते महापालिकेकडून प्राप्त केले. हे सर्व करण्यामागे केवळ आपले सरपंच पद कायम रहावे व आपण अपात्र ठरू नये, असा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप तक्रारकर्ता सदाशिव गलसिंग चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणात न्यायालयात खोटे कागदपत्र देणे, खोटे सरकारी दस्तावेज तयार करणे, अशा विविध प्रकरणात रामदासपेठ पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश शनिवारी न्यायालयाने दिले.

 

सदाशिव चव्हाण यांनी अॅड. धीरज शुक्ला यांच्या मार्फत पाचवे न्यायदंडाधिकारी शुभदा ठाकरे यांच्या न्यायालयात आरोपीविरुद्ध कलम १५६ (३) नुसार याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी म्हटले होते की, प्रेमदास जानू पवार यांनी २२ नोव्हेंबर २००२ रोजी जन्माला आलेली मुलगी रोशनी उर्फ राणी ही १२ व्या दिवशी मृत पावली. २९ डिसेंबर २००४ रोजी जन्माला आलेला मुलगा सनी तीन महिन्यात मृत पावल्याचे कागदोपत्री दस्तावेज उपलब्ध केले. तसेच या प्रकरणात रोशनी उर्फ राणी हिच्या मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी थेट न्यायालयात यांनी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात प्रेमदास जानू पवार आणि त्याची पत्नी संगिता प्रेमदास पवार, संतोष रमेश उंबरकार यांनी त्यांना सहकार्य केले असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. प्रेमदास जानू पवार हे ग्राम पहाडसिंगी येथे सरपंचपदावर २०१७ मध्ये निवडून आले. त्यांना तीन अपत्य असून त्यांनी हे घोषणा पत्रात पातूर येथील निवडणूक अधिकार्‍यांना खोट्या शपथेवर सांगितले. या प्रकरणात तक्रारकर्त्याने रामदासपेठ पोलिसांकडे तक्रार केली होती पण त्यांनी ती नोंदवून न घेतल्याने अखेर न्यायालयाने या विरोधात १५६ (३) अंतर्गत दाखल केलेल्या याचिकेवर शनिवारी निर्णय दिला व रामदासपेठ पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात अ‍ॅड. धीरज शुक्ला यांनी युक्तीवाद केला. तर अ‍ॅड. शुभम मोहता व अ‍ॅड प्रदीप रोकडे यांनी त्यांना सहकार्य केले.

 

दोन्ही मुले शाळेत
सरपंच प्रेमदास जानु पवार यांची दोन्ही मुले शाळेत आहेत. अकोला येथील नामांकित शाळेत ते शिकत आहेत. तक्रारकर्ताने त्यांच्या शाळेतील अस्तित्वाबाबतचे कागदपत्रेही न्यायालयात सादर केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...