आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोळाव्या वर्षी समाजसेवा! अनाथ मुलींना दिल्या सायकल; 'आस' फाउंडेशन फाऊंडेशनचा उपक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अवघ्या १६ ते १८ वर्षे वयोगटातील काही युवकांनी सुरू केलेली 'आस' फाऊंडेशन आता सामाजिक कार्यात उतरली आहे. सोमवारी अकोल्यातील सुर्योदय आश्रमातील अनाथ विद्यार्थीनींना सात सायकलींचे वितरण करून या युवकांनी आणखी एक आदर्श उभा केला. 


आस फाऊंडेशनची उभारणी केलेल्या युवकांना त्यांच्या शिक्षकांनी कधीतरी अनाथ आश्रमात नेले होते. तिथली मुले बघून ही युवा मंडळी भावनिक झाली होती. त्या भारावलेपणातूनच त्यांनी 'आस' फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या माध्यमातून ते आता वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. असाच एक उत्तम उपक्रम त्यांनी टॅलेंट सर्च परीक्षा घेऊन तडीस नेला. या परीक्षेला १९०० विद्यार्थी बसले होते. खर्च वजा जाता उरलेल्या रकमेतून त्यांनी सात सायकली विकत घेतल्या. या सायकली सोमवारी सकाळी सूर्योदय आश्रमातील अनाथ विद्यार्थिनींना वितरित करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. या आस फाऊंडेशनमध्ये इयत्ता १२ वीच्या आतील विद्यार्थी आहेत. या वयात मुलांना सहसा पैशाचे आकर्षण असते. या मुलांना एकदा त्यांचे शिक्षक अनाथ आश्रमात घेऊन गेले. तेथून त्यांच्या मनात उपेक्षित घटकांसाठी काम करण्याची जिद्द निर्माण झाली. आलोक दैय्या, गौरव टोपरे, श्रेयस चांडक, देवराज परांडे, आदित्य ऐललकर, ऋत्वीज कारखानीस या विद्यार्थ्यांनी आस नावाचे फाउंडेशन तयार करून सामाजिक उपक्रम राबवणे सुरु केले. 


गुणवंतांसाठी परीक्षा, शुल्कातून उभा केला पैसा 
आस फाऊंडेशनच्या या युवकांनी मार्च महिन्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च ही परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेसाठी अकोला शहरातील खंडेलवाल ज्ञानमंदिर स्कूल गोरक्षण रोड, नोवेल स्कूल, समर्थ पब्लिक स्कूल व ऑटोक्रॅट कोचिंग क्लासमधील १९०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रती विद्यार्थी २० रुपये शुल्क त्यांनी आकारले होते. त्यातून त्यांच्याकडे ३८ हजार रुपये गोळा झाले. या ३८ हजार रुपयांमधून त्यांनी विजेत्या आणि स्पर्धेत सहभागी विद्ेयार्थ्यांकरीता प्रमाणपत्रे व बक्षिसांसाठी १० हजार रुपये खर्च केला. २१ हजार रुपयांच्या सात सायकली विकत घेतल्या व त्या सायकली सूर्योदय बालगृहातील सात अनाथ मुलींना वितरित केल्या. या वेळी सूर्योदय बाल गृहाचे संचालक शिवराज पाटील व नोवेल स्कूलचे मुख्याध्यापक अनोष मनवर उपस्थित होते. उर्वरित सात हजार रुपयांमधून वृक्षारोपण करण्याचा या समाजशील विद्यार्थ्याचा मानस आहे. 

 
उपक्रमाचा शिक्षणावर परिणाम होऊ देत नाही, काहीतरी उत्तम केल्याचा आनंद होतो 
आम्ही जे उपक्रम राबवतो. त्याचा आमच्या शिक्षणावर परिणाम होऊ देत नाही. शाळा सोडून आम्ही काहीच करत नाही. फावल्या वेळात आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो. त्यातून आम्हाला खूप आनंद मिळतो. 
- आलोक दैय्या, अध्यक्ष आस फाउंडेशन

बातम्या आणखी आहेत...