आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला - शासनाने घोषित केलेली ३० टक्के नोकर कपात रद्द करण्याच्या प्रमुख मुद्द्यासह विविध २४ मागण्यांसाठी आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्या विविध क्लासेसच्या विद्यार्थी-युवकांचे हे आंदोलन होते.
सकाळी साडे अकराच्या सुमारास हे युवक येथील बाबूजी देशमुख वाचनालयात जमा झाले. त्यानंतर जुने शहर, गांधी रोड, पंचायत समिती चौक असे मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. या ठिकाणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना निवेदन देऊन त्यांनी आपली व्यथा स्पष्ट केली.
एमपीएससीची तयारी करणारे जिल्ह्यात पंधरा हजारावर विद्यार्थी असून जागांच्या तोकड्या संख्येत आपले स्थान कोठे असेल, याबद्दल ते कमालीचे साशंक आहेत. त्यामुळे शासनाने रिक्त असलेल्या सर्व जागांची भरती करावी, जेणेकरून गेल्या तीन-चार वर्षांपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी आर्जवही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे व्यक्त केली.
शासनाने अलीकडेच नोकर भरतीत कपात करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचा फटका एमपीएससीची तयारी करणाऱ्यांना बसला असून आयोगाने केवळ ६८ जागांसाठीच जाहिरात काढली आहे. त्यामुळे आणखी ४५० जागांसाठीची जाहिरात प्रकाशित करावी, १.७० लाख रिक्त पदे भरण्याची मोहीम सुरु करावी, एमपीएससीची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जावी, जागा भरण्यासाठी तमिळनाडू पॅटर्न राबवावा, शासनाने एमपीएससीच्या मुख्यालयीन इमारतीसाठी जागा द्यावी, चतुर्थ श्रेणीची कंत्राटी भरती रद्द करून ती शासकीय करण्यात यावी, गट-क पदासाठीच्या सर्व परीक्षा एमपीएसीमार्फत घेण्यात याव्या आदी मागण्याही या वेळी रेटण्यात आल्या.
एमपीएससी विद्यार्थी मोर्चा समन्वय समितीच्या नावाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. समितीचे अध्यक्ष विलास साखरकर, उपाध्यक्ष अक्षय डोंगरे व सचिव प्रतिभा इंगळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. त्यांच्याशिवाय राहुल देशमुख, नीलेश घोगरे, निखिल पाली, प्रसाद सातव, आकाश काटेकर, अमर खराटे, रवि डोंगरे, अंकीत पाटील, मनोज भोपळे, सचिन अडगावकर, मिलिंद वानखडे, रोहित मोरे, प्रिया सातव अश्विनी जोशी, विद्या खंडारे, पल्लवी राऊत, मेघा सरप, कुणाल जनपागे, भारत लोखंडे, विजय बावणे यांनीही आजच्या आंदोलनात सहभाग घेतला.
वर्षभरात घेतल्या जातात तीन परीक्षा : एमपीएससीतर्फे वर्षभरात तीनदा परीक्षा घेतली जाते. यामध्ये श्रेणी एकमधील नायब तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदासाठीची राज्य सेवा पूर्व परीक्षा, श्रेणी दोनमधील पीएसआय, एसटीआय व एओएससाठीची महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि सचिवालय/मंत्रालयातील लिपिक, कर सहायक व राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (पीएसआय) या तृतीय श्रेणीसाठीची महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा समावेश आहे. या परीक्षा यावर्षी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात घेतल्या जाणार आहे. मात्र त्यासाठीच्या जागा अत्यंत कमी आहे. त्यामुळे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात भीती दाटून आली आहे.
या संस्थांच्या विद्यार्थ्यांचा होता समावेश : आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी-युवक बाबूजी वाचनालयासह शासकीय ग्रंथालय, बी. आर. आंबेडकर वाचनालय, अक्षय वाचनालय, पारसकर वाचनालय, पीकेव्ही फोरम, साने गुरुजी वाचनालय आदी ठिकाणी सुरु असलेल्या एमपीएससी दालनांचे सक्रिय सदस्य आहेत. याशिवाय शहरातील किमान पंधरा वर्गांसह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येकी तीन प्रशिक्षण क्लासेसच्या विद्यार्थ्यांचाही आंदोलनाला पाठिंबा होता.
संयुक्त परीक्षेमुळे गमावली जाते संधी : पूर्वी पीएसआय, एसटीआय व एओएस या तीन पदांसाठी स्वतंत्र परीक्षा घेतली जायची. त्यामुळे एक संधी हुकल्यास त्याच वर्षी दुसऱ्या पदाची परीक्षा देता यायची. या तिन्ही पदासाठी संयुक्त परीक्षा होत असल्याने हुकलेली संधी वर्षभरानंतर मिळते. तृतीय श्रेणी पदांच्या महा. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेलाही ही बाब लागू आहे.
सांगा कशा मिळवाव्या आता आम्ही नोकऱ्या?
स्पर्धा परीक्तून बुद्धीचा कस लावून मिळणारी ही नोकरी आहे. त्यासाठी एमपीएससी, युपीएससीची तयारी केली जाते. मात्र शासनाने स्वीकारलेल्या नोकर कपातीच्या धोरणाने त्यावर विरजण पडले. त्यामुळे रिक्त पदांसाठी परीक्षा घेतानाच पीएसआय, एसटीआय, एओएस पदासाठीची राज्य सेवा पूर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे स्वतंत्र घ्यावी.
- अक्षय डोंगरे, विलास साखरकर, प्रतिभा इंगळे, एमपीएससी विद्यार्थी मोर्चा समन्वय समिती, अकोला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.