आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटामधून काढला 10 किलो मांसाचा गोळा, जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जवळपास दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर एका ६५ वर्षीय महिलेच्या पोटातून दहा किलो वजनाचा मांसाचा गोळा काढण्यात यश आले आहे. ही यशस्वी शस्त्रक्रिया आज २३ मे रोजी करण्यात आली आहे. सध्या स्थितीत रुग्ण महिलेची प्रकृती ठीक असल्याचे शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

बुलडाणा शहरातील जुना गाव आंबेडकर नगर मधील रहिवासी शकुंतलाबाई खरात वय ६५ यांचे मागील काही दिवसापासून पोट दुखत होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्या खासगी दवाखान्यात जावून महागडा उपचार करू शकत नव्हत्या. त्यामुळे दहा दिवसापूर्वी त्या येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्या. दरम्यानच्या काळात रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सोनोग्राफीसह त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी रुग्ण महिलेच्या पोटात मांसाचा गोळा असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. परंतु रुग्ण महिलेच्या शरीरात रक्त कमी असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे अवघड झाले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दोन पिशव्या रक्त दिले. त्यानंतर महिलेची प्रकृती ठीक झाल्यानंतर शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी व डॉ. गायकी यांनी आज शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

 

यावेळी भुलतज्ञ डॉ. उंबरकर व डॉ. फाळके यांनी रुग्ण महिलेला भुलीचे इंजेक्शन दिले. सकाळी साडे दहा वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. तब्बल दोन तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्या वृद्ध महिलेच्या पोटातून दहा ते बारा किलो वजनाचा मासांचा गोळा काढण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले आहे. सध्या रुग्ण महिलेची प्रकृती चांगली असल्याचे शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सामान्य रुग्णालयातील अधिपरिचारीका जाधव व वॉर्ड बॉय नाटेकर यांनी सहकार्य केले.

 

तपासण्यासाठी गोळा पॅथॉलॉजीस्टकडे पाठवला
दोन तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून दहा ते बारा किलो वजनाचा गोळा काढण्यात आला आहे. हा गोळा तपासणीसाठी पॅथॉलॉजिस्ट कडे पाठवण्यात आला आहे. पॅथॉलॉजीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

- डॉ. भागवत भुसारी, शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय बुलडाणा.

 

 

बातम्या आणखी आहेत...