आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भासह राज्याच्या इतर भागात सेंद्रिय शेतीला पोषक वातावरण; डाॅ. एस. के. सिंग यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- झाडे प्राणवायू म्हणजे आॅक्सीजन सोडतात आणि कार्बनडाय आॅक्साईड शोषून घेतात, हे शाळेत सर्वजण शिकतात. परंतु प्रत्यक्षात झाडे लावण्याऐवजी झाडांची कत्तलच अधिक होते. हवेतील कार्बन शोषून घेणारे ग्रीन कव्हर विरळ होत चालले आहे. नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरोने (एनबीएसएस) मातीमध्ये आर्गेनिक कार्बनचे प्रमाण प्रति हेक्टरी किती टन आहे, याचा संपूर्ण देशाचा नकाशा तयार केला आहे. यामुळे एकीकडे शेतीसाठी धोक्याची घंटा असतानाच विदर्भ-मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात सेंद्रिय शेतीला पोषक वातावरण असल्याची माहिती एनबीएसएसचे संचालक डाॅ. एस. के. सिंग यांनी "दिव्य मराठी'ला दिली. 


मातीमधील आर्गेनिक कार्बनचे प्रति हेक्टरी टनाचे १-१०, १०-१५, १५-२०, २०-२५, २५-३०, ३०-३५ व ३५-५० इतके असते. यामध्ये प्रति हेक्टरी ३०-३५ व ३५-५० इतके प्रमाण सर्वोत्तम समजले जाते. २५-३० उत्तम व २०-२५ मध्यम समजले जाते. १-१० धोकादायक आणि १०-१५ हे चिंताजनक प्रमाण असल्याचे सिंग यांनी सांगितले. देशाचा विचार केल्यास मातीमधील आर्गेनिक कार्बनचे प्रति हेक्टरी ३५-५० टन हे सर्वोत्तम प्रमाण नाॅर्थ-ईस्ट रिजनमध्ये आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचलमध्ये हे प्रमाण ३०-३५ टन इतके आहे. गुजरातमधील बनासकाठा, मेहसाना, खेडा, गांधीनगर, बडोदा आदी भागात मातीमधील आर्गेनिक कार्बनचे प्रति हेक्टरी टनाचे प्रमाण निकृष्ट म्हणजे १०-१५ टन इतके कमी आहे. 


महाराष्ट्राचा विचार केल्यास सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक भागात ३० ते ३५ इतके आहे. मराठवाड्यातील काही भागात १५ ते २० आणि काही भागात २० ते २५ इतके आहे. तर विदर्भात मातीमधील आर्गेनिक कार्बन प्रति हेक्टरी २५-३० टन इतके आहे. िवदर्भ आणि मराठवाड्यात सेंद्रिय शेतीला उपयुक्त प्रमाण आहे. सेंद्रिय शेतीला सिंचनाची जोड मिळाल्यास हे दोन्ही प्रदेश सुजलाम सुफलाम होतील, असे सिंग यांनी स्पष्ट केले. विदर्भ आणि मराठवाड्यात ज्वारी, बाजरीसह फळ पिकांवर भर द्यायला हवा. रासायनिक शेतीचा अतिरेक टाळून रासायनिक व सेंद्रिय शेतीवर भर देत दोन्हीचा समतोल साधल्यास येथील शेतकरी समृद्ध होईल, असे सिंग म्हणाले. 


विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी 'निरांचल' हाती घेतला कार्यक्रम 
मराठवाड्यातील अहमदनगर आणि विदर्भातील अमरावती या दोन जिल्ह्यासाठी निरांचल कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन आणि एनबीएसएसमध्ये सामंजस्य करार झाला आहे. आर्थक बाजू स्पष्ट झाल्या की लवकरच या योजनेवर काम सुरू करण्यात येईल. तांत्रिक प्रशिक्षण आम्ही देणार आहो. दोन्ही जिल्ह्यांतील प्रत्येकी १० गावात येत्या पाच वर्षात वाॅटर शेडची कामे करायची आहे, असे सिंग यांनी सांगितले. 


अॅग्रो इकाॅलाॅजीकल आणि प्रायोरिटी असे दाेन झाेन करण्यात अाले तयार 
मातीमधील आर्गेनिक कार्बनच्या प्रति हेक्टरी प्रमाणानुसार "अॅग्रो इकाॅलाॅजीकल' आणि "प्रायोरिटी' असे दोन झोन तयार केले आहे. आर्गेनिक कार्बनचे प्रमाण उत्तम असलेल्या विभागांचा समावेश "अॅग्रो इकाॅलाॅजीकल' झोनमध्ये आणि प्रमाण निकृष्ट म्हणजे १ ते १० आणि त्यापेक्षाही खाली असलेल्या प्रदेशाचा समावेश "प्रायोरिटी' झोनमध्ये केला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश संपूर्ण तर पश्चिम बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकचा काही भाग "प्रायोरिटी' झोनमध्ये येता. 

बातम्या आणखी आहेत...