आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० लाख रुपयांचे सोयाबीन बियाणे रिपॅकिंग करून पाठवल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सोयाबीन बियाण्यांचे रिपॅकिंग करून फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याने पातूर मार्गावरील जानकी बीज प्रक्रिया केंद्रावर छापा टाकण्यात आला. जवळपास २० लाखाचे बियाणे रिपॅक करण्यात आल्याचा संशय असून त्यादृष्टीने कृषी अधिकारी तपास करत आहेत. 


अकोलापासून १५ किमी अंतरावर म्हैसपूर नजीक असलेल्या संजय ठाकूर यांच्या जानकी बीज प्रक्रिया केंद्रातून सोयाबीन बियाणे रिपॅक करून बाहेरच्या जिल्ह्यात पाठवण्यात येत असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, १४ जून रोजी दुपारी कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांच्या मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी वृषाली घुले, गुणवत्ता तांत्रिक अधिकारी चेडे अमरावती, तालुका कृषी अधिकारी शास्त्री व सहकाऱ्यांनी कारवाई केली. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. उद्या या प्रकरणातील सत्य बाहेर येऊ शकेल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पेरणीचे दिवस आहेत. बी-बियाणे घेण्याची शेतकऱ्याची लगबग आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळते की नाही, याची खातरजमा करण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विभागातील महत्त्वाचे अधिकारी रजेवर गेलेले आहेत. 


बियाण्यांमध्ये भेसळ होण्याची दाट शक्यता 
तालुक्यातील बहुतांश कृषी मंडळ अधिकारी व कृषी अधिकारी पदे रिक्त आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक रजेवर आहेत. कृषी विभागाचा वचक नसल्याने बियाण्यांमध्ये भेसळ होण्याची दाट शक्यता आहे. 


ठाकूर आणि ममदे यांच्यामध्ये झाला वाद 
दिवसभर कारवाई करत आहात आम्ही काही चोर नाही. रात्रीचे ८ वाजत आहेत. तुमची कारवाई झाली असल्यास आम्हाला जाऊ द्या, तुम्हीही जा, असे म्हणत केंद्राच्या किल्ल्या टाकून संजय ठाकूर घटनास्थळाहून निघून गेले. दरम्यान पोलिस अधिकारी दाखल झाले. केंद्र संचालक कुठे आहेत अशी विचारणा माने पाटील यांनी केली. कोणाला कोंडले आहे, अशीच सुरुवात त्यांनी केली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ठाकूर तेथे पोहोचले नव्हते. कारवाई सुरूच होती. 


नांदेडला बियाणे पाठवल्याचा दाट संशय 
रिपॅकिंग करून सुमारे २० लाखाचे बियाणे नांदेडला पाठवण्यात आल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्या दिशेने तपास करण्यात येत आहे. रिपॅकिंग करून सुमारे २० लाखाचे बियाणे नांदेडला पाठवण्यात आल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्या दिशेने तपास करण्यात येत आहे. सर्व बियाण्याची तपासणी झाल्यानंतर शुक्रवारी सत्यता बाहेर येणार आहे. 


रात्री ८ वाजता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी 
बीज प्रक्रिया केंद्रावर कृषी अधिकाऱ्यांसमवेत गैरव्यवहार होत असल्याचा मेसेज पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत गेल्याने उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील, सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, बार्शिटाकळीचे ठाणेदार तिरुपती राणे, पातूरचे ठाणेदार डी. सी. खंडेराव घटनास्थळी पोहोचले. चौकीदार, जानकीचे हमाल यांची पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. 


बियाणे कंपन्यांची नियमित तपासणी व्हावी
गुणवत्ता नियंत्रण विभागाने बियाणे कंपन्यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र ती होत नसल्यामुळे बोगस बियाण्याची विक्री होते. मात्र त्याचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका सहन करावा लागतो. नियमित तपासण्या झाल्यास शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल. 

बातम्या आणखी आहेत...