आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री कार्यालयात शिक्षकांची धाव; विषय शिक्षकांची पदे भरणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- प्राथमिक शिक्षकांच्या अाॅनलाईन बदली प्रक्रियेबाबत रविवारी शिक्षकांनी थेट पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांच्या संपर्क कार्यालयात धाव घेतली. शिक्षकांनी अापल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी पालकमंत्री, शिक्षक संघटनांची समन्वय समिती, जि.प. अधिकाऱ्यांची बैठक यांची संयुक्त बैठक झाली. ४७१ विषय शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात येणार असून, रंॅडम राऊंडमधील शिक्षकांना पुनर्पदस्थापना मिळणार अाहे. त्यामुळे नंतर समुपदेशनाने पुन्हा या शिक्षकांच्या बदल्या हाेणार अाहेत. परिणामी शिक्षकांमधील संघर्ष हाेणार असून, प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील सुरु हाेण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे अाहे. विस्थापित झालेल्या विषय पदवीधर शिक्षकांचे प्रश्न व त्यांच्या इतर समस्या तातडीने सोडवल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. पाटील यांनी याप्रसंगी दिली. 


जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या १७५४ शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या हाेत्या. या बदल्या संवर्ग १ व २ मध्ये करण्यात अाल्या. मात्र काही शिक्षकांची खोट्या कागदपत्राच्या आधारे बदली करण्यात अाल्याचा अाराेप शिक्षकांनी केला हाेता. नंतर शेवटच्या अर्थात रंॅडम राऊंडसह एकूण २२९० शिक्षकांच्या बदल्या करण्यात अाल्या. याबाबतच्या लढा उभारण्यासाठी समन्वय समितीची स्थापन करण्यात अाली. 


दुर्गम भागातील महिलांवरील अन्याय हाेणार नाही
दुर्गम भागात नोकरी करणाऱ्या महिला शिक्षकांना योग्य न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डाॅ. पाटील यांनी दिली. बैठक पालकमंत्र्यांच्या कार्यालयात झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीचे संजय भाकरे, प्रकाश चतरकर, शशिकांत गायकवाड, शत्रुघ्न िबडकर, नामदेवराव फाले, केशव मालोकार, संतोष महल्ले, जब्बार हुसैन, देवानंद मोरे, शाम कुलट, रामदास वाघ, महादेव तायडे, रजनिश ठाकरे, आदींसह डॉ. अशोक ओळंबे उपस्थित होते. याप्रसंगी जवळपास ३०० शिक्षकही हाेते. 


बैठकीचा वृत्तांत : जिल्हयातंर्गत बदल्यांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांचे प्रश्न निर्माण झाले आहे, तसेच विषय शिक्षकांच्या नेमणुकीचा प्रश्न 2013 पासून प्रलंबित आहे. अशा ४७१ शिक्षकांच्या प्रश्नाविषयी पालकमंत्री यांच्याशी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत चर्चा केली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिक्षण विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. विस्थापित शिक्षकांचा प्रश्न तातडीने सोडवण्याबाबत त्यांना सूचना केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांना जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आजच वरिष्ठ कार्यालयाला ई-मेल व्दारे माहिती कळवण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचित केले. संवर्ग एक, दोन व तीनमध्ये खोटी माहिती भरणाऱ्या शिक्षकांची चौकशी करुन त्यावर कार्यवाही करावी, अशीही सूचना पालकमंत्री डाॅ. पाटील यांनी केली. 


आता पुढे काय हाेऊ शकते? 
विषय शिक्षकांच्या ४७१ जागा असून, रंॅडम राऊंडमध्ये ४१९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात अाल्या. विषय शिक्षकांच्या जागेवर सहायक शिक्षकांची नियुक्ती करण्यात अाली. अाता शासनाने अादेश दिल्यास विषय शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येतील. परिणामी शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता अाहे. त्यामुळे साेयीच्या ठिकाणी बदली झालेल्या शिक्षकांना समुपदेशनाने बदल्या कराव्या लागतील. या प्रक्रियेत समाधान न झालेले शिक्षक अाक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसंगी ते न्यायालयात धाव घेऊ शकतात. याच निमित्ताने सहायक शिक्षकांची विषय शिक्षकांच्या जागी नियुक्ती काेणी केली, हे नियमानुसार हाेते काय, नसल्यास संबंधितांवर कारवाई हाेईल काय, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित हाेत अाहेत. 


काय अाहे निवेदनात ? 
जि. प. शिक्षक संघटना समन्वय समितीने पालकमंत्र्यांना निवेदन दिले. संवर्ग १ ते ४ या टप्प्यात बदल्या केल्या. त्यानंतर सहायक शिक्षकांच्या ५९ जागा रिक्त असून, जिल्ह्यात ५२० सहायक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे ५व्या राऊंडमध्ये अर्ज भरताना ५२० शिक्षकांना ५९ गावांचाच पर्याय हाेता. त्यांना पंसतीक्रम देणे शक्य नव्हे. परिणामी शिक्षकांना साेयीची गावं मिळाली नाहीत, असे या निवेदनात नमूद केले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...