आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील अधिकृत-अनधिकृत होर्डिंग्ज काढणार, स्थायी समितीचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - 'शहरातील अधिकृत, अनधिकृत आदी सर्व प्रकारचे होर्डिंग्ज त्वरित काढून घ्यावेत तसेच योग्य जागी होर्डिंग्ज लावण्यासाठी नियमानुसार नव्याने निविदा प्रसिद्ध कराव्यात,' असा महत्त्वपूर्ण निर्णय स्थायी समितीच्या मंगळवारी २७ फेब्रुवारी ला झालेल्या अखेरच्या सभेत घेतला.

 

स्थायी समितीच्या सभेला प्रारंभ झाल्या नंतर भाजपचे अजय शर्मा यांनी मागील सभेत तत्कालीन आयुक्तांनी कलमांचा वापर करून दिलेल्या कामांच्या ठरावाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर सभापती बाळ टाले यांनी कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर इतिवृत्तावर चर्चा झाल्या नंतर विषय पत्रिकेतील जाहिरात आणि पार्किंगच्या जागेबाबतच्या विषयावर चर्चा सुरु करण्यात आली. मात्र अतिक्रमण विभागाला जाहिरात होर्डिंग्ज बाबत पुरेशी माहिती सभागृहाला सादर करता आली नाही. शहरात १८७ अधिकृत होर्डिंग्ज असल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली. मात्र होर्डिग्जची परवानगी देताना नेमकी कोण-कोणती कागदपत्रे लागतात? असा प्रश्न अजय शर्मा यांनी विचारल्या नंतर या प्रश्नाचे उत्तर अतिक्रमण विभागाला देता आले नाही. त्याच बरोबर जाहिरातीच्या माध्यमातून नेमका किती महसूल जमा झाला? याबाबतही माहितीही अतिक्रमण विभागाला देता आली नाही.


तर सभापती बाळ टाले यांनी ऑटोवर लावण्यात येणाऱ्या जाहिरातीबाबत महापालिका प्रत्येक ऑटो कडून महिन्याकाठी ७० रुपये प्रमाणे जाहिरात कर वसूल करते, यातून किती महसूल जमा झाला? असा प्रश्न उपस्थित केला. या सर्व प्रश्नांची उत्तरे अतिक्रमण विभाग तसेच प्रशासनाला देता आली नाही. या प्रकाराबाबत सभापती तसेच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर चर्चा झाल्या नंतर सभापती बाळ टाले यांनी शहरातील सर्व अधिकृत तसेच अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश दिले त्याच बरोबर होर्डिंग्ज लावण्याबाबत नव्याने निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान आऊट सोर्सिंगचा मुद्दा पुन्हा या सभेत गाजला. कॉग्रेसचे पराग कांबळे आणि भाजपचे अजय शर्मा यांनी आऊट सोर्सिंगबाबत प्रशासनाला विविध प्रश्न उपस्थित करून भंडावून सोडले. अजय शर्मा म्हणाले, कंपनीला काम देताना राज्य शासनाच्या जीआरचे पालन केले काय? नियमानुसार शैक्षणिक पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे का? तर पराग कांबळे म्हणाले, कर्मचाऱ्यांचा पीएफ त्यांच्या खात्यात वळता केला जातो का? आदी प्रश्नांची उत्तरे प्रशासनाला समाधानकारक देता आली नाही. यावर अभ्यास करून उत्तर दिले जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...