आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावर्षी शाळा समितीकडूनच विद्यार्थ्यांना गणवेश; ४०० ऐवजी आता गणवेशासाठी मिळतील ६०० रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची प्रक्रिया आता राज्य शासनाने सुधारली आहे. यापूर्वीची क्लिष्ट पद्धत आता बदलली असून त्या ऐवजी शाळा व्यवस्थापन समितीच गणवेश खरेदी करणार असून थेट विद्यार्थ्यांना हे गणवेश दिले जाणार आहेत. तसेच दोन गणवेशासाठी आता ४०० रुपयांऐवजी ६०० रुपये मिळणार आहेत. 


महापालिका शाळांमधील सर्व मुली तसेच एससी, एनटी आणि बीपीएल धारक पालकांच्या पाल्यांना राज्य शासनाकडून गणवेशासाठी अनुदान दिले जाते. पूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच गणवेशाची खरेदी करीत होती.मात्र राज्य शासनाने या पद्धतीत बदल करून पालकांनी गणवेश खरेदी करावा. खरेदी केलेल्या गणवेशाची पावती मुख्याध्यापकांना द्यावी आणि त्या नंतर ४०० रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात वळते करायचे, अशा पद्धतीचा वापर केला. मात्र प्रथम विद्यार्थ्यांच्या नावे बँकेत खाते उघडण्यासाठी पैसे खर्च करा, त्यानंतर गणवेश खरेदीसाठी पैसे खर्च करा आणि त्यानंतर गणवेशाचे पैसे मिळणार, या क्लिष्ट पद्धतीमुळे मागील शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागले होते. या अनुषंगाने अकोला महापालिकेसह विविध महापालिकांनी राज्य शासनाकडे गणवेश वाटपात येणाऱ्या अडचणी नमूद करून यात सुधारणा करण्याची विनंती केली होती. राज्य शासनाने सारासार विचार केल्या नंतर ही क्लिष्ट पद्धत बदलून आता विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळा व्यवस्थापन समितीला प्रत्येक विद्यार्थ्यामागे ६०० रुपये या नुसार निधीचे वाटप केले जाणार असून शाळा व्यवस्थापन समिती या निधीतून गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना थेट वाटप करणार आहे. या पद्धतीमुळे कोणताही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार नसून मुख्याध्यापकांच्या मागची कटकटही या निमित्ताने थांबली आहे. 


मागील शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या ३२ शाळांमध्ये एकूण ७ हजार २१३ विद्यार्थी होते. यापैकी सर्व मुली आणि एससी, एसटी, बीपीएल धारक यांची संख्या ४ हजार ८२१ असून या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी लागणारा २८ लाख ९२ हजार ६०० रुपयाचा निधी मुख्याध्यापकांच्या खात्यात वळता करण्यात आला आहे. 


इतर विद्यार्थ्यांनाही लाभ 
शासनाच्या या योजनेत एससी, एनटी आणि बीपीएल धारक विद्यार्थ्यांना गणवेशासाठी निधी दिला जातो. त्यामुळे इतर कॅटॅगिरीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी महापालिकेला स्वत:चे पैसे खर्च करावे लागणार आहेत. या कॅटॅगिरीत २,३९२ विद्यार्थी आहेत. त्यांंच्या गणवेशासाठी महापालिकेला १४ लाख ३५ हजार खर्च करावा लागेल. 

बातम्या आणखी आहेत...