आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात चोरट्यांनी एकाच रात्री ३ दुकाने फोडली; सीसीटीव्हीमध्ये चोर झाले कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शेतकऱ्यांच्या शेतातील अॅल्युमिनिअमच्या विजेच्या तारा चोरणारा भंगार विक्रेता निघाला. स्थानिक गुन्हे शाखेने भंगार विक्रेत्यासह त्याच्या सोबत्यालाही गजाआड केले आहे. या चोरट्यांनी सन २०१५ पासून पातूर, चान्नी, बोरगाव मंजू व मूर्तिजापूर शिवारातील विजेच्या खांबावरून तारा चोरल्याचे समोर आले आहे. तर दुसऱ्या कारवाईत एका चेनस्नॅचरला पकडून त्याच्याकडून वेगवेगळ्या चार गुन्ह्यातील १० तोळे वजनाच्या सोनसाखळ्या जप्त केल्या आहेत, अशी माहिती पाेलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत दिलीे. दरम्यान, बुधवारी रात्री सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. त्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. 


पातूर, चान्नी , बोरगाव मंजू, उरळ व मूर्तिजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेतातून विजेच्या तारा चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणांचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांनी पीएसआय चंद्रकांत ममताबादे, एसआय अशोक चाटी, पोकाँ शेख हसन, अब्दुल माजीद, एजाज अहमद, रवि इरचे व संजय पाटील यांचे एक पथक गठित केले. या पथकाने संशयावरून पातूर येथे भंगारचा व्यवसाय करणारा शेख मोहम्मद उर्फ बबलू शेख अफसर रा. समी प्लॉट याच्यावर नजर ठेवली. मात्र तो घरीच येत नसल्याचे नक्की झाल्यानंतर २७ एप्रिल रोजी पोलिसांनी त्याला पातूर येथून ताब्यात घेतले. त्याने पातूर तालुक्यातील आगीखेड शेतशिवारात हातरुण येथील शेख किस्मत शेख रफिक याच्या मदतीने अॅल्युमिनिअमच्या तारा चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांचाही कसून चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळ्या सात ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी तीन लाख रुपयांच्या तारांसह मुद्देमाल जप्त केला आहे. 


तसेच शहरात झालेल्या चेनस्नॅचिंगच्या घटनांतील आरोपीला श्रीरामपूर येथून पकडले. त्याने चार महिलांच्या सोनसाखळ्या चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख ७२ हजार रुपयांचे १० तोळे वजनाचे चोरी गेलेले सोने जप्त केले. ही कारवाई पीएसआय रणजितसिंग ठाकूर, पोकाँ शक्ती कांबळे, संदीप काटकर, शेख हसन यांनी केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे होते. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवायांचे पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले. दरम्यान, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडल्यामुळे शहराची सुरक्षा पुन्हा धोक्यात आली आहे. 


पत्रे काढून चोरटे घुसले दुकानात 
बुधवारी रात्री दीड वाजताच्या दरम्यान सिटी कोतवालीच्या हद्दीतील अशोककुमार भाटिया यांचे भाटिया फॅशनमध्ये चोरटा छतावरून घुसला. त्याने लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच शेजारीच असलेल्या ऋषी वाधवानी व सुरेश भाटिया यांच्या फुटवेअरच्या दुकानातही चोरट्यांनी हात साफ केला. चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच श्वान पथकांना पाचारण करण्यात आले होते. 


चोरट्याने कपडे घालून पाहिले 
चोरटा दुकानाच्या छतावरून कापडाच्या दुकानात घुसला. त्याने कपडे अस्ताव्यस्त केले. त्यानंतर त्याने काही कपड्यांचे मोजमाप घेऊन अंगाला लावून पाहिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. त्यानंतर चोरट्याने बॅटरीच्या सहाय्याने दुकानातील तिजोरी शोधण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार चोरट्याने लाखोंचा ऐवज लंपास केला. 
कपड्याच्या दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज. 


नागरिकांनी चेनस्नॅचरला पकडण्यात मदत करावी 
शहरात घडत असलेल्या चेन स्नॅचरच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना मदत करावी. संशयित व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. 
- एम. राकेश कलासागर, पोलिस अधीक्षक 

बातम्या आणखी आहेत...