आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महसूल'मध्ये १८ लिपिक, २७ एकेंच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हाधिकारी कार्यालयासह एसडीओ आणि तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात २७ अव्वल कारकून (एके) आणि १८ लिपीकांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 


या वर्षीच्या बदल्या समुपदेशनाने करावयाच्या असल्याने बदलीपात्र सर्व कर्मचाऱ्यांना थेट जिल्हाधिकारी यांच्या कक्षात बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.   त्यानंतर सर्वसंमतीने बदल्यांची गावे ठरविण्यात आली. याबाबतचे आदेश सोमवार, २८ मे रोजी जारी केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी अशा त्रिसदस्यीय समितीने या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले. 


महसूल खात्यात गतवर्षी बदली प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचे अंतर्गत खाते बदल केले जात आहे. ३१ मे हा ही प्रक्रिया राबवण्याचा शेवटचा दिवस असल्याने सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागामध्ये बदल्यांच्याच फायलींवर काम केले जात आहे. कोतवाल, शिपाई, वाहनचालक, लिपिक, तलाठी, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आणि एसडीओ (उपजिल्हाधिकारी) अशी महसूल खात्याची रचना आहे. यातील पहिल्या सात संवर्गाच्या बदल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या प्रक्रियेने वेग घेतला आहे. 


प्राप्त माहितीनुसार लिपिक आणि एकेंच्या बदलीपाठोपाठ चतुर्थ आणि तृतीय श्रेणीतील इतर कर्मचारीही बदलीस पात्र आहेत. परंतु त्यांची संख्या मोजकी असल्याने बदल्या कराव्या की नको, याचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरच घेतला जाणार आहे. याशिवाय नायब तहसीलदार, तहसीलदार, एसडीओ-उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्यांचा निर्णय विभागीय आयुक्त पातळीवर घेतला जाणार आहे. 


सहा वर्षे पूर्ण झाले म्हणून बदली 
एकाच खात्यात सहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठीची नोकरी झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. त्या सूत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालय व सातही तालुक्याच्या ठिकाणी असलेले एसडीओ-तहसील कार्यालये यामध्ये १८ लिपिक आणि २७ एके बदलीपात्र ठरले आहेत. जिल्ह्यात एकूण १६४ लिपिक आणि १२२ एके कार्यरत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...