आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाला देयकासाठी मागितली १ लाख ६० हजारांची लाच, कृषी अधिकाऱ्यासह तिघांना पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बांधकामाचे ११ लाख रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी १ लाख ६० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर तालुका कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. सोबतच लाचेचे भागिदार तालुका कृषी सहायक महिला व तिच्या पतीलाही ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी अकोट पंचायत समितीमध्ये सापळा रचून करण्यात आली. 

 

तालुका कृषी अधिकारी मंगेश अरूण ठाकरे (वय-३२ वर्षे, रा. चिंचखेड ता. अकोट), कृषी सहायक वनमाला उत्तमराव भास्कर उर्फ वनमाला प्रभुदास सुरत्ने (वय २२, रा. भवानीविहार अकोट) व वनमालाचा पती प्रभुदास कडुजी सुरत्ने (वय ३५ रा. भवानी विहार ) असे लाचखोरांची नावे आहेत. 

 

अकोट तालुक्यांतर्गत जलयुक्त शिवारअंतर्गत कामांसाठी अकोट येथील एका तरूण कंत्राटदाराने २०१७मध्ये ११ लाख रुपयांचे निविदाद्वारे कंत्राट घेतले होते. सदर कंत्राटदाराने वेळेतच काम पूर्ण केले. ऑक्टोबर २०१७पासून त्याने देयक काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे, कृषी सहायक वनमाला यांच्याकडे अर्जफाटे केले होते. मात्र लाच घेतल्याशिवाय देयक काढणार नाही, असे या लाचखोरांकडून त्याला ठणकावून सांगण्यात आले होते. ११ लाख रुपयांची रक्कम काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे, वनमाला व तिचा पती याने एक लाख ६० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी एसीबीने पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणीत तिघांचाही समावेश दिसून आला. 

 

जिल्हा परिषदेत पाचव्या दिवशी दुसरा ट्रॅप 

जिल्हा परिषदेला लाचेचे ग्रहण लागल्याचे शनिवारच्या कारवाईवरून सिद्ध झाले. मंगळवारी शिक्षण विभागातील दोघांना हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. तर पाचव्याच दिवशी अकोट पंचायत समितीमधून कृषी अधिकाऱ्यासह तिघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा कोरा धनादेश व ६० हजार रुपये जप्त केले. 

 

बातम्या आणखी आहेत...