आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध आंदोलन: स्वाभिमानीचे तुपकर यांना अटक व सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- पोलिसांना हुलकावणी देत भूमिगत अवस्थेत दूध आंदोलन हाताळणाऱ्या स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना आज, २० जुलै रोजी पुण्यात अटक करण्यात आली. रविकांत तुपकर, प्रल्हाद इंगोले व इतर कार्यकर्त्यांना पुणे लष्कर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने रविकांत तुपकर व सहकाऱ्यांना ३१ जुलैपर्यंतचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. 


दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात दुधाच्या गाड्यांची व टँकरची तोडफोड झाली होती. या तोडफोडच्या घटनांना जबाबदार धरून पुणे पोलिसांनी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, सुजित हांडे, अमर पाटील यांच्यावर १७ जुलै रोजी प्रॉपर्टी डॅमेज अॅक्टनुसार गुन्हे दाखल केले होते. १७ जुलै रोजी पुणे विश्रामगृह येथून अमोल हिप्परगे व अमर पाटील यांना अटक केली होती. त्यानंतर दोघांना १८ जुलै रोजी ३१ जुलैपर्यंतचा जामीन मंजूर केला होता. परंतु, रविकांत तुपकरांनी पोलिसांना हुलकावणी देत भूमिगत अवस्थेत आंदोलन हाताळले. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली १७ जुलैपासून युद्धपातळीवर शोध चालू ठेवला होता. रविकांत तुपकरांच्या शोधासाठी पोलिसांनी पुण्याच्या आजूबाजूला ७ ते ८ ठिकाणी धाडी टाकल्या. परंतु, त्यांना अपयश आले. शेवटी २० जुलै रोजी त्यांना पुण्यात अटक केली. 

बातम्या आणखी आहेत...