आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू; दाळंबी येथील खड्ड्यात बुडाल्याने करूण अंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाेरगावमंजू/कुरणखेड- बोरगावमंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोळंबी येथील शाळेत शिकणाऱ्या दाळंबी येथील दोन विद्यार्थ्यांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार,२८ जून रोजी घडली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. 


दाळंबी येथील गौरव सत्यवान वाहुरवाघ, वय १४ वर्षे, संघर्ष सुभाष चक्रनारायण, वय १३ वर्षे हे कोळंबी येथील श्री शंकर विद्यालयात शिकत होते. ते गुरुवारी सकाळी नियमित शाळेत आले होते. दरम्यान, दुपारी ते शाळेत दफ्तर ठेवून गावा शेजारीच दुधलम रोडवरील एका १०० फुट लांब, ५० फुट रुंद तर १५ ते २० फुट खोल असलेल्या तळयानजिक गेले होते. दरम्यान, शाळेची घंटा वाजून शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांसह शिक्षक निघून गेले. शाळा सुटल्यावर गौरव व संघर्ष हे घरी दाळंबी येथे परतले नाहीत म्हणून नातेवाइकांनी शोध घेतला असता गावा शेजारीच खोल खड्ड्याच्या काठावर गौरव व संघर्ष यांच्या चप्पल आढळून आल्या. गौरव व संघर्ष याच पाण्यात बुडाले असावे, असा संशय निर्माण झाल्यानंतर पिंजर येथील संत गाडगे बाबा आपत्कालीन पथकास पाचारण केले. पथकाने गौरव व संघर्ष यांचे मृतदेह पाण्यातून काढले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पी. के. काटकर यांनी ताफ्यासह तसेच आमदार हरीश पिंपळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गौरव व संघर्ष यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आले. 


खड्ड्यामुळे गेला जीव, ठेकेदारावर कारवाई करावी

या घटनेत विशेष बाब समोर आली आहे. मुलांचा ज्यामध्ये मृत्यू झाला तो तलाव नसून अनधिकृतरीत्या गौण खनिज तस्करीमुळे निर्माण झालेला खड्डा असल्याचे समोर आले आहे. तसेच या खड्ड्यामधील मुरूम हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कामासाठी वापरण्यात आला आहे. तरी या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूला शाळा प्रशासन की, महसूल विभाग जबाबदार आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...