आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशाचा निधी झाला शाळांच्या खात्यांत जमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात खामगाव तालुक्यातील १९ हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश मिळणार असून खामगाव तालुक्यासाठी १ कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. 


सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्यात येतात. या योजनेत सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच बीपीएल धारक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तालुक्यात टेंभुर्णा, पळशी, बोथाकाजी,अटाळी लाखनवाडा, गणेशपूर, हिवरखेड, गोंधनापूर, सुटाळा, भालेगाव, निपाना, पिंपळगाव राजा, रोहणा, खामगाव १ व खामगाव २ या केंद्रांतर्गत जिल्हा परिषदेच्या १६९ तर नगर पालिकेच्या १६ शाळा आहेत. या शाळेत १९हजार ७६३ विद्यार्थी मोफत गणवेश योजनेचे लाभार्थी आहेत. यामध्ये मुली १२ हजार ८८१,अनुसूचित जाती ३ हजार ५९२,अनुसूचित जमाती ४ हजार ४६ तर बीपीएलचे २ हजार ८४४ लाभार्थी आहेत. एका विद्यार्थ्यांच्या दोन गणवेशासाठी प्रत्येकी ३०० रुपये या प्रमाणे ६०० रुपये अनुदान दिल्या जात आहे. 


मागील वर्षी हेच अनुदान प्रत्येकी एका गणवेशासाठी २०० रुपये प्रमाणे दोन गणवेशासाठी ४०० रुपये एवढे होते. मात्र यावर्षी या अनुदानात प्रत्येकी १०० रुपयाने वाढ झाली आहे. खामगाव तालुक्यासाठी १ कोटी १८ लाख ५७ हजार ८०० रुपये एवढा निधी प्राप्त झाला असून हा निधी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात आला आहे. मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती गणवेश खरेदी करून देणार आहेत. वास्तविक शाळा उघडण्याच्या पहिल्या दिवशी मोफत पुस्तक वाटपासोबत मोफत गणवेश देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असतो. मात्र गेल्या काही वर्षांत बदलत्या धोरणामुळे गणवेश वाटपात विलंब होत आहे. त्यामुळे यावर्षीही शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाविना जावे लागले. मागील वर्षी तर वर्षभर गणवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना हेलपाटे खावे लागले. मात्र यावर्षी शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदीचे अधिकार दिल्याने विद्यार्थ्यांना थोडे लवकर गणवेश मिळण्याची शक्यता आहे. मोफत गणवेश योजनेचा प्राप्त झालेला निधी शाळांच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याची माहिती सर्व शिक्षा 


शाळा व्यवस्थापन समिती करणार गणवेश खरेदी 
मागील वर्षी पालकांना स्वत: दोन गणवेश खरेदी करून त्याची पावती शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करणे आवश्यक होते. तर लाभार्थी विद्यार्थी व त्याच्या आईच्या संयुक्त बँक खात्याची अट सुरुवातीला ठेवण्यात आली होती. यामुळे हजारो विद्यार्थी गणवेश लाभापासून वंचित राहिले होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळावा. तसेच पालकांना त्रास होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेश खरेदीची जबाबदारी देण्यात आली आहे. 


मोफत गणवेश योजनेचा निधी केला जमा 
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणार आहे. या योजनेचा निधी जिल्हास्तरावरून प्राप्त झाला आहे. हा निधी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना लवकर गणवेश उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
- जी. डी. गायकवाड, प्रभारी गटशिक्षणाधिकारी 

बातम्या आणखी आहेत...