आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याची पाणी पातळी गेली तब्बल ९० फूट खोल, २५ वर्षांपूर्वी मिळायचे ३० फूटांवर पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- भूजलाचा अती उपशावरच गेल्या अनेक वर्षात भर दिला गेला. परिणामी २५ वर्षापूर्वी हातपंप घेताना ३० फुटावर पाणी मिळायचे, आता मात्र ८० ते ९० फुट खोदल्या नंतर पाणी मिळते. तर काही भागात १०० फुटावरही पाणी मिळत नाही. हा सर्व परिणाम एकमेकांची जिरवताना भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याचे भान न ठेवल्याचा आहे. त्यामुळे आता पुढच्या पिढीला पाणी मिळवे, यासाठी पावसाचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरवणे गरजेचे आहे. यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना प्रत्येकाला राबवावी लागणार आहे. 


पाणी ही निसर्गाची महत्त्वपूर्ण देण आहे. माणुस पाण्या शिवाय जिवंत राहु शकत नाही, ही बाब सर्वज्ञात असताना माणसाने मात्र पाण्याची किंमत केली नाही. प्रत्येक पाणी टंचाईच्या काळात टंचाईचा सामना करताना केवळ जमिनीतील पाणी उपसण्यावरच भर दिला गेला. परंतु सुगीच्या दिवसात पाणी टंचाई निर्माणच होवू नये, यासाठी ठोस उपाय योजना केल्या नाही. भूजलाचा अति उपसा हा घातक ठरणारा आहे, ही बाब लक्षात आल्या नंतर शासनाने पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी जीआर प्रसिद्ध केले. मात्र हे जीआर केवळ फाइल्समध्ये राहिले. प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नाही. तसेच या योजनेला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी प्रयत्नही केले गेले नाही. त्याचा वितरित परिणाम आज भोगावा लागत आहे. 


या वर्षीही शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी ४ कोटी ६५ लाखाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातही भूजलाचा उपसा करण्यावरच कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहे. यात टॅँकरने पाणी पुरवठा आणि हातपंप घेण्यावरच भर देण्यात आला आहे. तर दुसरीकडे शहराच्या जवळपास सर्वच भागातील खासगी हातपंप, बोअर आटल्याने वैयक्तिक हातपंप घेतले जात आहे. शहरात वेगवेगळ्या भागात किमान सात ते दहा बोअरवेल घेतल्या जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे पाच वर्षाच्या काळात भूजलाची पातळी अडीच मीटरने खाली गेली आहे. भूजलाचा असाच उपसा सुरु राहिल्यास पुढील पाच वर्षात ही पातळी थेट पाच मीटरने खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


२५० फुटांपर्यंत घेतले जात आहेत बोअरवेल 
२५ वर्षापूर्वी ३० फुटावर पाणी लागायचे त्यावेळी ८० ते १०० फुट खोल बोअर घेतली जायची. आता ८० ते ९० फुटावर बोअर लागत असल्याने २०० ते २५० फुट खोल बोअर घेतल्या जात आहे. यामुळे जमिनीत खोल जाऊन शिल्लक असलेले पाणी खेचण्याचाच प्रकार बिनधास्तपणे सुरु आहे. 

 

नदी काठच्या भागातील हातपंपही पडले कोरडे 
शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या दोन्ही काठाच्या भागात असलेले बोअर आज पर्यंत आटले नाहीत. परंतु या वेळी नदीकाठच्या भागातील बोअर आटले असून, या भागातही नवीन बोअर घेताना ७० ते ८० फुटावर पाणी मिळत आहे. 


जमिनीला छिद्र पाडण्यासाठी कोट्यवधी; पाणी जिरवण्यासाठी 'एक पैसा' ही नाही 
महापालिकेने पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी चार कोटी ६५ लाख रुपयाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात ८५० नवीन बोअर घेण्याचे निश्चित केले आहे. तर टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी काेट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी एक पैशाचीही सोय या आराखड्यात केलेली नाही. 


आता एकच उपाय, आणि तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग 
पाणी टंचाईचा खऱ्या अर्थाने सामना करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे म्हणजेच शासकीय कार्यालयांसह प्रत्येक घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवणे गरजेचे आहे. मात्र दुर्देवाने शासकीय कार्यालयांनीच या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...