आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराला पाणी पुरवणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर 17 ठिकाणी गळती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- वाढत्या तापमानामुळे काटेपूर्णा प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन ४० टक्के होत असताना दुसरीकडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ३२ किलो मीटर लांबीच्या मुख्य जलवाहिनीवर १७ ठिकाणी गळती (लिकेज) झाल्याने पाण्याची गळती होत आहे. काही ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरुस्त आहेत तर काही ठिकाणी जलवाहिनीतून गळती होत आहे. जलवाहिनीतून २४ तास पाणी पुरवठा होत असल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. 


काटेपूर्णा प्रकल्पातून शहराला पाणी पुरवठा होतो. काटेपूर्णा प्रकल्प येथून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या महान येथे आहे. ६०० मिलिमीटर आणि ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. शहराला आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा होत असला तरी शहराचे सात झोन विभागल्याने काटेपूर्णा प्रकल्पातून दररोज पाण्याची उचल करावी लागते. त्यामुळे २४ तास पंपिंग सुरु राहते. काटेपूर्णा प्रकल्पात अत्यल्प जलसाठा राहिल्याने पाण्याची उचल कमी केली आहे. तूर्तास काटेपूर्णा प्रकल्पातून दररोज ४ कोटी ३० लाख लिटर पाण्याची उचल केली जाते. आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत असला तरी सात दिवसाचे पाणी एकाच दिवशी देण्यात येत आहे. तूर्तास दरडोई, दर दिवशी ६२ लिटर यानुसार पाणी पुरवठा केला जात आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने एप्रिल महिन्यातच बाष्पीभवनात वाढ झाली आहे. बाष्पीभवन रोखता येत नसले तरी गळती थांबवता येते. काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा जास्तीत जास्त दिवस पुरावा, यासाठी पाण्याची गळती थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र प्रशासनाचे गळतीकडे दुर्लक्ष झाले आहे. 


अकोला ते महान या ३२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीवर जवळपास ७५ व्हॉल्व्ह आहे. काही व्हॉल्व्ह आता नव्याने बसवले आहेत. परंतु तरीही काही ठिकाणी व्हॉल्व्ह मधून पाण्याची गळती होते तर काही ठिकाणी जलवाहिनीतून पाण्याची गळती होत आहे. अकोला ते महान या मार्गावर काही ठिकाणी पाण्याने भरलेले डबके पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे दररोज पाण्याची उचल केली जात असल्याने गळतीही २४ तास सुरु राहते. या सर्व प्रकारामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. 

 

तीन ठिकाणी व्हॉल्व्हला बसवले नळ 
विद्रूपा नदीच्या पुलाखाली, दगड पारवा आणि बार्शीटाकळी टर्निंग या तीन ठिकाणी व्हॉल्व्ह मधून गळती होते. या तीनही ठिकाणचे व्हॉल्व्ह महापालिकेने वारंवार दुरुस्त केले. परंतु प्रत्येक वेळी ग्रामस्थांनी पाण्यासाठी दरवेळी व्हॉल्व्ह नादुरुस्त केले. अखेर दगड पारवा येथे व्हॉल्व्हलाच नळ लावले, जेणे करून पाण्याचा अपव्यय थांबवा. या तिन्ही ठिकाणी कान्हेरी, दगड पारवा, बार्शीटाकळीचे ग्रामस्थ तहान भागवतात. 


जलशुद्धीकरण केंद्रातून २४ तास पंपिंग सुरु असल्याने २४ तास जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरु असतो. काटेपूर्णा प्रकल्पातून दररोज ४ कोटी ३० लाख लिटर पाण्याची उचल केली जाते. महापालिकेचे ३८ हजार अधिकृत नळधारक आहे. तर दरडोई ६२ लिटर पाणी पुरवठा केला जातो. या अनुषंगाने विचार केल्यास या गळतीच्या माध्यमातून दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. 


जलवाहिनीचा व्हॉल्व्ह दुरुस्त करू 
व्हॉल्व्ह दुरुस्तीची नोटशिट प्राप्त झाली. परंतु त्यासाठी पाणी पुरवठा बंद करावा लागणार आहे. ही मोठी समस्या आहे. मात्र पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्यासाठी लवकरच जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती केली जाईल. 
- जितेंद्र वाघ, आयुक्त, महापालिका. 

बातम्या आणखी आहेत...