आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला परिसरातील धबधबे पर्यटकांना सुखावणारे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पावसाळ्यात मन आल्हाददायी करणारी हिरवळ मनात भरते. जलाशये भरलेली असतात त्यामुळे साहजिकच पर्यटकांचा त्याकडे आेढा असतो. पर्यटनासाठी अकोला आणि परिसरातही रम्य स्थळे आहेत. पावसाळी पर्यटनाला निघाल्यास त्याची मजा लुटता येईल. निसर्गरम्य अशा पर्यटनस्थळांमध्ये दुधाणी जंगलातील वॉटरफॉल, जटाशंकर वॉटरफॉल यांचा उल्लेख करावा लागतो. त्यांची आेळख करुन घेऊ या... 


दुधाणी वॉटरफॉल : अकोल्याहून पातूर, माळराजुरा मार्गाने गेल्यावर फाट्याने दुधाणी पर्यंत वाहनाने जाता येते. दुधाणीपासून दीड ते दोन किमी. निसर्गरम्य पहाडातून ट्रेकिंग करत आपण दुधाणी येथे पोहोचतो. तेथे सुंदर वॉटरफॉल आहे. उंचावरून पडणारे शुभ्रपाणी, अवतीभवतीचे जंगल आणि पहाडातून पडणारी सूर्यकिरणे हे दृश्य कितीही अनुभवले तरी मन भरत नाही. वॉटरफॉल खाली खोल डोह नसल्यामुळे अडीच तीन फूट पाण्यात मस्ती करण्याची मजा घेता येते. अकोल्यापासून ४० किमी अंतरावर हे स्थान आहे. 


जटाशंकर वॉटरफॉल : अकोट-हिवरखेड मार्गावर सोनाळा गावाजवळ करमला गावापासून उजवीकडे वळल्यावर शिवनी गाव लागते. तेथून एक स्थानिक गाइड सोबत घेऊन जटाशंकर वॉटर फॉलला जाता येते. शिवनीपासून दोन किमी. ट्रेकिंग करत वॉटरफॉल पर्यंत जावे लागते. उंच पहाडामध्ये वाहणाऱ्या नदीचे पाणी वडाच्या झाडाच्या पारंब्यातून साधारण १०० ते १२५ फुटावरून खाली पडते. पहाडावर सुद्धा या नदीचे पात्र फक्त ३ फूट खोल असून त्यामध्ये स्नानाचा आनंद लुटता येतो. वॉटरफॉलचे पाणी अंगावर घेत उडणाऱ्या तुषारांमुळे आपण निसर्गाशी एकरूप होतो. वडाच्या पारंब्यातून पाणी येत असल्यामुळे ते आैषधीयुक्त व वेगळाच सुगंध घेऊन येते. पाण्यामध्ये मनसोक्त विहार केल्यावर टेकडीवर जटाशंकर महादेवाचे दर्शन घेता येते. 


सेल्फीचा मोह टाळा 
पावसाळी पर्यटन करताना पाऊस नसताना वॉटरफॉल पाहण्यास जाणे हितकारक असते. वॉटरफॉलच्या वर उभे असताना सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. जंगलातील पाणी निर्मळ आणि स्वच्छ असते. त्यामुळे पाण्यात साबणाने अंघोळ करु नये. वॉटरफॉलचे पावित्र्य राखावे. 
- गोविंद पांडे, वन्यजीव व पर्यावरण अभ्यासक 

बातम्या आणखी आहेत...