Home | Maharashtra | Vidarva | Akola | We will contest 48 seats in Lok Sabha If Congress not answer

काँग्रेस पक्षाकडून उत्तर न आल्यास लोकसभेच्या ४८ जागा लढवणार

प्रतिनिधी | Update - Aug 02, 2018, 11:54 AM IST

राज्यातील वंचित समाज घटकांची मोट बांधून सत्ता काबीज करणे हा वंचित बहुजन आघाडी स्थापनेमागील उद्देश आहे.

 • We will contest 48 seats in Lok Sabha If Congress not answer

  अकोला- राज्यातील वंचित समाज घटकांची मोट बांधून सत्ता काबीज करणे हा वंचित बहुजन आघाडी स्थापनेमागील उद्देश आहे. कारण विद्यमान किंवा त्यापूर्वीच्याही सरकारांनी वंचित घटकांची पार निराशा केली आहे. आणि सध्या तर परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. अशा वेळी सावध राहण्याची गरज असल्याची जाणीव आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना करुन दिली.


  खेडकर सभागृहात वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेदरम्यान झालेल्या सभेत ते बोलत होते. बारामतीचे माजी आमदार अॅड. विजयराव मोरे, 'उपरा'कार लक्ष्मण माने, आमदार बळीराम शिरस्कार, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, जि. प. अध्यक्षा संध्याताई वाघोडे, माजी आमदार हरिदास भदे, जि. प. चे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, अॅड. संतोष रहाटे, जि. प. उपाध्यक्ष जमीरभाई, प्रदीप वानखडे व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


  मेळाव्याचे संयोजक हरिदास भदे यांनी आयोजानामागील हेतू स्पष्ट केला. वंचितांच्या हाती सत्तेची दोरी असल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात लढा उभारला आहे. सर्वदूर त्याची व्याप्ती पोहोचवणार आहोत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कारभारावर तोफ डागली. राज्यात सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही, असा त्यांचा राेख होता. अॅड. वंदन कोहाडे, अॅड. श्रीराम मोरे, वामनराव मानकर, प्रदेश नेते अनिल शिंदे, नंदू गोपुलवार, विक्रम जाधव, गजाननराव वाघमारे यांनी समाजाच्या वेदना मांडल्या. डॉ. दशरथ भांडे यांनी वंिचतांना न्याय देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले.

  अॅड. संतोष रहाटे यांनी सध्या वंचित घटकांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे उदाहरणासह सांगितले. तर, आमदार बळीराम सिरस्कार यांनी परिस्थितीचे गांभीर्य आेळखण्याची गरज आहे, या मुद्द्यावर भर दिला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षआ संध्याताई वाघोडे यांनी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे लाल दिव्याच्या गाडीचे हकदार होता आले, असे सांगून येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. अॅड. विजयराव मोरे म्हणाले, पुण्याला वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. लोकशाहीचे समाजीकरण झाले पाहिजे. त्या माध्यमातून गरिबांचे प्रश्न सुटले पाहिजे, असा प्रयत्न राहणार आहे. मुख्यमंत्रिपदी बाळासाहेबांना पाहायचे आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरू अाहे. वंचित बहुजन आघाडीला सत्तेत आणणे या ध्येयास अनुसरून ' मी बहुजन आघाडीला सत्तेत आणण्याचा तनमनधनाने प्रयत्न करेन, अशी शपथ दिली.


  दंगली मुख्यमंत्री घडवत आहेत
  राज्यातील दंगली मुख्यमंत्री घडवत असल्याचा आरोप पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील अराजकाला कारणीभूत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. 'आरएसएस'ला देशाची घटना बदलायची आहे, असे ते या वेळी म्हणाले.


  पुढे काय ?
  अकोला जिल्ह्यात बहुजन आघाडीची समन्वय समिती स्थापन करणार आहे. यासाठी नावे नोंदवा आणि आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिदास भदे, सुरेश सिरसाट यांनी केले. सुरुवातीला कलावंतांनी गोंधळ सादर केला.जमीरभाई यांनी आभार मानले. मेळाव्याला नागरिकांची मोठी उपस्थिती होती.


  संपत्तीत मागा वाटा
  आरक्षणाऐवजी समाजातील दोन नेत्यांच्या संपत्तीत वाटा मागा, समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी जीव गमावण्यापेक्षा समाजातील दोन प्रमुख नेत्यांच्या संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करुन त्यातून वाटा मागा. आरक्षणाची गरज पडणार नाही, खूप लूटमार झाल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले.


  लोकशाहीच्या सामाजीकरणासाठी वंचित बहुजन आघाडीद्वारे लोकजागर
  लोकशाहीचे सामाजीकरण होत नाही तोवर विकासाची चर्चा निरर्थक आहे. वंचित घटकांना सत्तेत वाटा मिळावा, त्यांच्यावरील अन्याय दूर व्हावा या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीद्वारे लोकजागर करत अाहे, अशी माहिती आघाडीचे नेते, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सेक्युलर पक्ष असल्याने आम्ही वंचित घटकांतून लोकसभेच्या जागा द्याव्यात, असा प्रस्ताव काँग्रेसला दिला. त्यांनी उत्तर नाही दिले तर लोकसभेच्या राज्यातील ४८ जागा आघाडी लढवेल, असे ते म्हणाले. एकीकडे मराठा तरुण आरक्षणासाठी रस्त्यावर आहे तर दुसरीकडे अधिकांश सत्ता मराठा समाजाकडे आहे. सत्ताधारी मराठ्यांची आरक्षणाची मागणी नव्हती त्यामुळे ते याला महत्व देत नाहीत, असे त्यांनी या वेळी सांगितले. ३ ला अमरावती, ४ ला यवतमाळ, ५ ला वर्धा येथे मेळावे आहेत.


  स्वीस बँकेतील पैसा गेला कुठे ?
  भारतीयाचे स्वीस बँकेतील पैसा कमी झाल्याचे केंद्राकडून सांगण्यात येते. मग हा पैसा गेला कुठे, असा सवाल अॅड. आंबेडकर यांनी केला. बॅलन्स शीटमध्ये दिसत नाही. एनपीए कमी होत नाही. १० लाख कोटीचे बुडीत कर्ज आहे ते कमी झाले नाही.


  आंदोलन पेटवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून
  मराठा आंदोलन पेटवण्याचे काम सरकार करत आहे. मराठा युवकांची आरक्षणाची मागणी योग्य परंतु वेळ चुकली आहे. धनगर समाजाप्रमाणे मराठा समाजानेही सरकारला ठामपणे विचारून भूमिका ठरवावी. सध्या उंदीर मांजराचा खेळ चालला आहे. यामध्ये ससेहोलपट होता कामा नये.

Trending