आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला- एका ४० वर्षीय महिलेला दोघांनी दुचाकीवर शेतात नेऊन तिला धमकावून बलात्कार केला. ही घटना रविवारी घडली असली तरी मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर पीडित महिलेने बुधवारी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पीडित महिला बकरीचा चारा शेतातून आणून अकोल्यात विकण्याचे काम करते. तिच्या अगतिकतेचा फायदा खदान परिसरात राहणारा सय्यद बिलाल सय्यद मेहबूब याने घेतला. माझे शेत बाळापूरजवळील दधम शिवारात आहे. तेथे भरपूर चारा आहे, असे म्हणून पीडित महिलेला दुचाकीवर बसवून रिधाेरा जवळील दधम शिवारात घेऊन गेला. यावेळी त्याने त्याचा मित्र सागर उर्फ अविनाश वैराळे (बार्शिटाकळी) यालाही पूर्वकल्पना दिली व त्याला सोबत घेतले. शिवारातील झोपडीत ते दोघेही तिला घेऊन गेले. त्यांनी तिला धमकावले व तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
भेदरलेल्या महिलेने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी तिला धमकावले. महिला घरी आल्यानंतर तिने पतीला आपबिती सांगितली. त्यानंतर पीडित महिला व तिचा पती यांनी बुधवारी खदान पोलिस ठाणे गाठले. ठाणेदार संतोष महल्ले यांनी महिलेची तक्रार घेत तत्काळ आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना केले. गुन्हा दाखल होईपर्यंत पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. या आरोपीविरुद्ध बलात्कार करणे, धमकावणे व जीवे मारण्याची धमकी देणे या कलमान्वये गुन्हे दाखल केले. घटनास्थळ बाळापूर पोलिसांच्या हद्द असल्याने खदान पोलिस सदर गुन्हा बाळापूर पोलिसांकडे वर्ग करणार आहेत. ही कारवाई एसडीपीओ उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात खदान पोलिसांनी केली. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी महिलांनी कुणावरही विश्वास न ठेवता सावधानता बाळगायला हवी.
आरोपी सय्यदची गुन्हेगारी पृष्ठभूमी
आरोपी सय्यद बिलाल याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दुसरा आरोपी अविनाश वैराळे हा इलेक्ट्रीशनचे काम करतो. या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली दुचाकी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत जप्त केली नव्हती.
मुलीवर अत्याचाराची दिली होती धमकी
पीडित महिलेने वाच्यता करू नये, म्हणून आरोपींनी तिच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी दिली होती. तसेच कुकृत्य करताना महिलेचा मोबाइल वाजल्यानंतर आरोपींनी तो हिसकावून घेऊन बंद केला होता, अशी माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.