Home | Maharashtra | Vidarva | Akola | Woman started readymade toilet business in rural areas

महिलेने ग्रामीण भागात सुरू केला रेडिमेड शौचालयाचा उद्योग; ग्राहकांकडून पसंती, अनेकांना रोजगार

प्रतिनिधी | Update - Jul 30, 2018, 12:26 PM IST

ग्रामीण भागातील महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात, हे येथील नीलिमा दत्तात्रय काळे यांनी दाखवून दिले आहे. त

 • Woman started readymade toilet business in rural areas

  हिवरा आश्रम- ग्रामीण भागातील महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात, हे येथील नीलिमा दत्तात्रय काळे यांनी दाखवून दिले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी गावातच समृद्धी कारखाना सुरू केला आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या घरातील महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती आता शौचालय निर्मितीसाठी सरसावल्याचे दिसून येत आहे. कमी वेळात व कमी खर्चात तयार होणाऱ्या रेडिमेड शौचालयाला ग्राहकांची पसंती मिळत आहे. त्यामुळे नीलिमा काळे या ग्रामीण भागातील पहिल्या महिला उद्योजिका ठरल्या आहेत.


  येथील रहिवासी नीलिमा काळे या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी नोकरीची कास न धरता ग्रामीण भागात एका एकराच्या शेतात समृद्धी रेडिमेड शौचालय निर्मितीचा कारखाना सुरू केला आहे. समृद्धी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील १० ते १५ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सदर कारखान्यातील रेडिमेड शौचालय चार बाय चार बाय एवढ्या आकाराचे असल्यामुळे ते कमी जागेत बसवता येते. शौचालय बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून चार हजार, तर राज्य शासनाकडून आठ हजार असे एकूण १२ हजार रुपयांचे अनुदान शौचालय निर्मितीसाठी मिळते. परंतु शासनाकडून मिळालेल्या रकमेतून शौचालय तयार करणे शक्य होत नाही. मात्र या समृद्धी कारखान्यातून निर्मित होणारे रेडिमेड शौचालय हे अत्यंत माफक दरात उपलब्ध होते. रेडिमेड शौचालय विकत घेण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील महिलांनी न्यूनगंड दूर केला, तर महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात. हेच त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.


  उद्योग क्षेत्रातील भरारी अन्य महिलांसाठी ठरतेय प्रेरणादायी
  समृद्धी रेडिमेड शौचालय निर्मिती कारखान्यातून एका दिवसाला ५० ते ६० रेडिमेड शौचालयाची निर्मिती होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अत्यंत कमी वेळ, श्रम व कमी खर्चात हे रेडिमेड शौचालय ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. नीलिमा काळे यांनी उद्योग क्षेत्रात घेतलेली भरारी इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

  - संजय वडतकर जि. प. सदस्य, बुलडाणा.

Trending