आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशामध्ये महिला असुरक्षित; त्यामुळेच संविधान बचाव मोहीम : फौजिया खान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- भाजपच्या काळात देशातील वातावरण बिघडले आहे. महिला असुरक्षित आहे. संविधानही धोक्यात आले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे संविधान बचाव, देश बचाव अभियान राबवण्यात येत आहे. देशपातळी,राज्य आणि विभाग पातळीवर यासाठी कार्यक्रम घेतले जात असून १७ जुलैला नागपूर येथे वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित केला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी मंत्री फौजिया खान यांनी दिली. 


या अभियानाच्या अनुषंगानेच त्या येथे दौऱ्यावर आल्या असता ६ जुलैला पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. फौजिया खान म्हणाल्या, देशात मागील ७० वर्षात कोणत्याही व्यक्तीचे स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आली नव्हती. मात्र सर्रासपणे सुरु आहे. बोलण्यातून विरोध केला तर हत्या केली जाते. मीडियावरही सत्ताधाऱ्यांनी अंकुश ठेवले आहे. लोकशाहीत मीडिया हा महत्त्वाचा आहे. मात्र मीडियावरच दबाव येत असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे आता देशात न्याय व्यवस्था असताना देखील समूह (एक गट) न्याय देण्याचे काम करीत आहेत. थेट कायदा हातात घेतल्या जात आहे. त्यामुळेच संविधान बचाव मोहिम ही केवळ मोहिम नसून दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे. 


देशात केवळ महिलाच नव्हे तर शेतकरी, विविध समाज आज आपल्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी विविध समाज रस्त्यावर कधीही उतरला नव्हता. या सर्व बाबी देश धोक्यात असल्याचे स्पष्ट करतात. एक प्रकारे ही अघोषित आणीबाणीच आहे. त्यामुळेच संविधान बचाव मोहिम देशपातळीवर राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा प्रारंभ २० जुन रोजी मुंबईला झाला. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. तर आता विभागाचा कार्यक्रम नागपूर येथे १७ जुलैला होत आहे. या कार्यक्रमालाही शरद पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच विदर्भातील महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फौजिया खान यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष विजयराव देशमुख, महानगराध्यक्ष राजु मुलचंदानी, श्रीकांत पिसे, रफिक सिद्दीकी, मंदा देशमुख आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

बातम्या आणखी आहेत...