आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगावमध्ये टेक्सटाईल पार्कची उभारणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - बुलडाणा जिल्ह्यात दोन लाख ५० हजार ७५८ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी छाननीअंती दोन लाख १३ हजार २८९ अर्ज पात्र ठरले. या सर्व पात्र शेतकऱ्यांना एक हजार १२९ कोटी रूपयांची कर्जमाफी मिळत आहे. तसेच पूर्ण माहितीअभावी प्रलंबित अर्जांवर निर्णय घेण्यासाठी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनाही लाभ देण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथ सांगितले. तसेच खामगावमध्ये टेक्सटाईल पार्कची उभारणी केली जाईल, असे ही ते म्हणाले.

 

खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर बुलडाणा जिल्हा कृषी महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे कृषि मंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, खासदार प्रतापराव जाधव, रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे, आमदार डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, मुंबईचे आमदारआशिष शेलार, जि.प. सभापती श्वेताताई महाले, विभागीय आयुक्त पीयुष सिंग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, फलोत्पादन विभागाचे संचालक प्रल्हाद पोफळे, नगराध्यक्षा अनिताताई डावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. कार्यक्रमादरम्यान शेतकरी मासिकाच्या कापूस विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. तसेच उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानातंर्गत १५१ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. प्रदर्शनीचे फित कापून उद््घाटन केल्यानंतर विविध स्टॉलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या. ,आभार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी मानले.


या वेळी कृषीमंत्री फुंडकर म्हणाले की, या कृषि महोत्सवाच्या माध्यमातून जगाचे तंत्रज्ञान दारावर आले आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. प्रदर्शन २० फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भेट देवून लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

कर्जमाफीत बुलडाणा अव्वल : मागच्या शासनकाळात ६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली होती यामध्ये अख्ख्या विदर्भाला १४०० कोटी दिले होते. परंतु आताच्या कर्जमाफी मध्ये एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख १३ हजार २८९ शेतकरी कर्जमाफी साठी पात्र ठरले असून, आतापर्यंत ११२९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर कर्जमाफी बंद झाली नसून ती सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

 

कौशल्य प्रशिक्षण: शेतीला कौशल्याची जोड देण्यासाठी केंद्र शासनासोबत करार करून शेतीचे कौशल्य विकसित करून देण्यात येणार आहे. अशाप्रकारे कार्यक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...