आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सर्व सोसायट्या, बँकांचे 'नील'चे दाखले लागणार नाही; जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांची सूचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धाड- पीक कर्ज वाटप करणाऱ्या स्टेट बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, बी डी सी सी बँक ह्या बँका गावातील सर्वच बँका व सोसायट्यांची नीलचे दाखले पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला आणायला भाग पाडत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक लूट व मानसिक त्रास होत होता. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी याविषयी निबंधक खरात यांना विचारले असता त्यांनी फक्त पीक कर्ज देणाऱ्या बँकांचे निलचे दाखले घेण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत. तसेच निलच्या दाखल्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकरण्याबद्दल सर्व बँक व सोसायट्यांना निर्देश दिले. त्या बाबतचे पत्र सर्वांना उद्याच देण्यात येतील, असे सांगितले. 


पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने योग्य ती काळजी घेऊन प्रत्येक शेतकऱ्यास यथोचित मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी केल्या.

 
येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या प्रांगणात ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक व जिल्हा केंद्रीय सहकारी बँक आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, दुय्यम निबंधक डॉ. अशोक खरात, नानासाहेब चव्हाण, ठाणेदार संग्राम पाटील, सरपंच रिझवान सौदागर, मंडळ अधिकारी अशोक शेळके, विजय टेकाळे, म. शफी, बबन फेपाळे, सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पीक कर्ज वाटप करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांचे नीलचे दाखले हे पीक कर्जासाठी घेण्यात यावे. तर पतसंस्था व पतपेढ्याचे नीलचे दाखले याची आवश्यकता नाही. तसेच इतर पतसंस्थांचा कर्जबोजा हा नियमित असल्याचे पीक कर्जास अडचणीचा ठरणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार नाही. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक कर्ज वाटप मेळाव्यात ६५० कर्ज प्रकरणांपैकी १७५ प्रस्ताव तयार असून, त्यातील पाच शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. येथील स्टेट बँकेच्या २३०० प्रकरणांपैकी ३५० प्रकरणे प्रस्तावित आहेत. त्यापैकी सात शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. जिल्हा केंद्रीय बँकेचे ४० प्रस्ताव तयार करण्यात आले. मेळाव्याला तलाठी किशोर कानडजे, शिवाजी तो, शेवाळे, संजय जगताप, बी.एस. सुरडकर, हिरालाल पतकी, संदिप शहागडकर, नारायण देठे यांच्यासह बँकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


दर शुक्रवारी लागणार पीक कर्ज मेळावा: पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना दररोज आपले कामे सोडून विनाकारण बँकांत चकरा माराव्या लागतात. हे सर्व थांबावे याकरिता दर शुक्रवारी मेळाव्यात शेतकऱ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज दाखल केले की लगेच बँक अधिकारी शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी कर्ज प्रकरण निकाली निघणार हे सांगतील. त्या दिवशी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतील. यामुळे शेतकऱ्यांना आपली महत्त्वाची कामे करणे सुलभ होईल. 


शेतकऱ्यांनी १०७७ या टोल फ्री न करावी तक्रार 
पीक कर्ज घेताना सर्व कागदपत्र असतानासुद्धा बँक टाळाटाळ करत असेल किंवा काही कारण नसताना पीक कर्ज नाकारत असेल अशा वेळी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी १०७७ या नंबर वर फोन लावून आपली समस्या सांगावी. तत्काळ त्या विषयी महसूल व सहकारी निबंधक कार्यालयाकडून कारवाई करण्यात येईल. येत्या दोन दिवसांत टोल फ्रि क्रमांक सुरू करण्यात येईल.
- अनुपमा डांगे, जिल्हाधिकारी बुलडाणा 


तर संपर्क करावा 
मेळाव्याचा ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने तलाठी दप्तरासह हजर राहतील. एक महसूल कर्मचारी मदतनीस प्रत्येक बँकेत राहील. शेतकऱ्यांना अडचणी आल्यास संपर्क साधावा. 
- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी बुलडाणा 

बातम्या आणखी आहेत...