आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफलाइन अर्जांमुळे शिष्यवृत्तीत पुन्हा नव्या घोटाळ्यांची नांदी, विद्यार्थ्‍यांना नाहक भुर्दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी समाज कल्याण विभागाने सुरु केलेली ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अडचणीत आल्याने ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. दरम्यान समाज कल्याण विभागाचा हा पर्याय नव्या घोटाळ्यांची नांदी तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 

राज्याच्या समाजकल्याण विभागातर्फे एससी व एसबीसी संवर्गाला शिष्यवृत्ती दिली जाते. बहुतेक शिष्यवृत्ती योजना मॅट्रीकोत्तर शिक्षणासाठी असल्यामुळे त्यासाठी हजारो विद्यार्थ्यांक़डून अर्ज दाखल केले जाते. हे अर्ज गतवर्षीपासून 'महाडीबीटी' पोर्टलवर भरुन घेतले जायचे. परंतु यावर्षी ते पोर्टल व्यवस्थितरित्या काम करीत नसल्याने शासनाने मध्येच निर्णय बदलून सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तींचे ऑफलाइन अर्ज मागवले आहेत. ऑफलाइन अर्जांमुळेच गतकाळात मोठा गहजब झाला होता. एकाच विद्यार्थ्याची कागदपत्रे वेगवेगळ्या संस्थांद्वारे निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी वापरून प्रवेश दाखविला जायचा आणि त्याआधारे प्रत्येक संस्थेत विद्यार्थी एकच, मात्र त्याच्या नावावर वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती लाटली जायची. ही बाब लक्षात आल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या (बार्टी) महाइस्कॉल या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा पर्याय अंमलात आणला गेला.

 

हा पर्याय चांगल्या प्रकारे कार्यरत असतानाच शासनाने गतवर्षी महाइस्कॉल ऐवजी महाडीबीटी हे नवे पोर्टल पुढे केले. परंतु ते अल्पायुषी ठरल्यामुळे आता थेट ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या नव्या पर्यायामुळे शिष्यवृत्ती योजनेत पुन्हा घोटाळा तर होणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.


मुळात महाइस्कॉल हे संकेतस्थळ उत्कृष्टपणे सुरु होते. परंतु महाडीबीटीसाठी त्यावरील सर्व डाटा स्थानांतरित करण्यात आला. प्रारंभी याच कारणामुळे चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरता आले नाही. त्यानंतर महाडीबीटीवर अर्ज दाखल करा, असे फर्मान जारी करुन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तोही अल्पायुषी ठरला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड हिरमोड झाला असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

'त्या' विद्यार्थ्यांना पुन्हा बसणार नाहक भुर्दंड
महाडीबीटी पोर्टल सुरु झाले, त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. परंतु आता त्यांनाही नव्याने ऑफलाइन अर्ज भरावे लागत आहे. समाज कल्याण आणि महाविद्यालय प्रशासनाने सक्ती केली असून हा भुर्दंड का, असा विद्यार्थी संघटनांचा सवाल आहे.

बातम्या आणखी आहेत...