आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या मृत्यूनंतर आईची गळफास घेऊन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- दुर्धर आजाराने ४५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटातच शोक अनावर झालेल्या ७५ वर्षीय मातेने शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेत विकून मुलाची प्रकृती ठिक न झाल्याने व कर्जबाजारी असल्याने वृद्ध महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. ही घटना शनिवारी घडली. 


या संदर्भात सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सुनील उत्तम वानखडे व भागरताबाई उत्तम वानखडे असे मृतक मायलेकांची नावे आहेत. सुनील यांच्या नावावर एक एकर शेत तर त्यांच्या पत्नीच्या नावावर सव्वा एकर शेती होती. मात्र सुनील यांना दुर्धर आजार जडल्याने त्यांना सव्वादोन एकर शेती विकावी लागली. त्यानंतर त्यांच्या आईच्या नावावर असलेल्या शेतीवर त्यांनी कर्ज काढले होते. शुक्रवारी १५ जूनला रात्री सुनील यांना रुग्णालयातून घरी नेल्यानंतर रात्री दोन वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचा धसका आईने घेतला. त्यांनी घरातील खाटेची दोरी घेतली व घराशेजारीच असलेल्या शाळेतील व्यायाम करण्याच्या साहित्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी शनिवारी १६ जूनला सकाळी मायलेकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले होते. दोन्ही मायलेकांवर शनिवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते पराग गवई व दिनकर पातोंड यांनी त्यांचे वानखडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. 


परिवारावर दु:खाचा कोसळला डोंगर 
सुनील यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मोठी मुलगी बीएच्या द्वितीय वर्षाला, दुसरी मुलगी १२वीत तर मुलगा नववीत शिकत आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे वानखडे कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

बातम्या आणखी आहेत...