आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: शरीयतपासून काेणताच त्रास नाही,अाम्ही समाधानी; मुस्लिम महिलांचा महामाेर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - 'तत्काळ तीन तलाक विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी १९ जानेवारीला मुस्लिम महिलांनी महामूकमाेर्चा काढला. 'शरीयतपासून अाम्हाला कोणताच त्रास नसून, अाम्ही कुटुंबात समाधानीच अाहाेत', अशा शब्दात ठणकावत महिलांनी या विधेयकाला विराेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या विधेयकाला विराेध करण्याच्या निमित्ताने विविध मुस्लिम संघटना एकटवल्या. महिलांचा सहभाग असलेला महामोर्चा अभूतपूर्वच असल्याचे जाणकारांचे म्हणणे अाहे.

 

तत्काळ तीन तलाकच्या विधेयकाविरुद्ध यापूर्वीही अनेक मुस्लिम संघटनांनी अाक्रमक पवित्रा घेतला हाेता. या विधेयकाची हाेळीही केली. अकाेला क्रिकेट क्लबवर सभाही घेतली. दरम्यान, १९ जानेवारी ला सुन्नी यूथ विंगतर्फे विधेयकाला विराेधासाठी महिलांचा सहभाग असलेला महामोर्चा काढला. महामाेर्चात मुफ्ती अारिफ, माैलाना गुलाम मुस्तफा, हाफिज मकसून, सै. गुलाम रसूल, माैलाना सय्यद शाहनवाज, माैलाना अासिफ रजा, मुफ्ती इस्माईल, हाफिज अय्युब, माैलाना रियाज, माैलाना अातिक, हाजी फारुक, हाजी अय्युब रब्बानी, माे. समीर माे. फरहान, असलम खान, जावेद जकेरिया, अासिफ खान अादींसह मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले हाेते.

 

अशीही शिस्त : महिलांचा सहभाग असलेल्या महामाेर्चात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अायाेजकांनी नियाेजन केले हाेते. प्रथम युवक बॅनर घेऊन पुढे हाेते. त्यानंतर काही अंतरावर महिला, नंतर पुरुष व शेवटी युवक, अशी महामाेर्चाची अाखणी केली हाेती. महिलांच्या सुरक्षेसाठी मानवी साखळीसारखे कवच केले हाेते. गडबड हाेऊ नये, यासाठी महामाेर्चाच्या समाराेपानंतर टप्प्या-टप्प्याने महिलांना साेडले.

 

कुठे अडले विधेयक : तत्काळ तीन तलाकला गुन्हा ठरवणारे विधेयक लोकसभेत २८ डिसेंबरला बहुमताने मंजूर केले हाेते. या विधेयकात काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. या दुरुस्त्यांवर लोकसभेत मतदानही घेतले हाेते. मात्र, या दुरुस्त्या फेटाळल्या. हे विधेयक राज्यसभेत अडकले अाहे. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्याने यासाठी संघर्ष करणाऱ्या मुस्लिम महिलांनी आनंद व्यक्त केला असतानाच या विधेयकाविरुद्ध महिला अाक्रमक झाल्या अाहेत.

 

अारक्षण, रोजगाराच्या प्रश्न साेडवा : सरकारने शरीयतमध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा मुस्लिमांना अारक्षण देऊन त्यांना जास्त संख्येने शासन सेवेत कसे सामावून घेता येईल याकडे लक्ष द्यावे, असे मुस्लिम महिला पत्रकारांशी बाेलताना म्हणाल्या. मुस्लिम कायदे, नियम हे बदलणे शक्य नाही. देशातील प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार अाचरणाचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले असून, शरीयतच्या अाचरणापासून अाम्हाला का राेखण्यात येत अाहे, असा सवाल मुस्लिम महिलांनी केला. तत्काळ तीन तलाक विधेयकाच्या बाजूने असणाऱ्या महिलांची संख्या अत्यल्प असून, बहुतांश महिलांनी या विधेयकाला विराेधच केला अाहे, असेही या महिलांनी स्पष्ट केले.

 

शरीयतमध्ये हस्तक्षेप अयोग्य : सुन्नी यूथ विंगच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कुराण, शरीयतमध्ये हस्तक्षेप करून सरकारने मुस्लिमांना त्रास देऊ नये, असे शिष्टमंडळातील माैलाना म्हणाले. अल्लाहने केलेल्या बाबी बदलता येणे शक्य नाही. अाम्ही देशाचे नागरिक असून, अाम्ही प्रामाणिक अाहाेत. अामच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पाेहाेचवा, अशा शब्दात माैलाना यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर अापल्या भावना व्यक्त केल्या.


असा हाेता पोलिस बंदोबस्त : महामाेर्चात अनुचित प्रकार घडू नये यासाठी १०८ पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात हाेते. त्यात दाेन उपविभागीय अधिकारी, ८ पोलिस निरीक्षक व ९८ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता. महामाेर्चाच्या मार्गात अनेक ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली हाेती.

 

जिल्हाधिकारी कार्यालयावर असा निघाला महामोर्चा
महामोर्चा मुफ्ती ए बराब अब्दुल रशीद यांच्या मार्गदर्शनाखाली व हजरत सय्यद जहरुल इस्लाम यांच्या अध्यक्षतेखाली काढला. महामाेर्चाला फतेह चाैक येथून सुरुवात झाली. महामाेर्चा डाॅ. आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळून, पंचायत समिती, जि.प. या मार्गाने निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महामाेर्चानंतर जिल्हाधिकारी अास्तिकुमार पाण्डेय यांना निवेदन दिले. या वेळी मुफ्ती ए बराब अब्दुल रशीद, हजरत सय्यद जहरुल इस्लाम, सुन्नी यूथ विंगचे जिल्हाध्यक्ष शाहीद इक्बाल रिजवी, माे. साकीब (गुड्डू मेमन), नासीर खान, इम्रान चाैहान, जुनैद खान यांच्यासह सुन्नी महिला िवंगच्या अालेमा अासफिया शबनम, अालेमा काैसर, अालेमा शिरीन फातेमा, अालेमा हुमा कैसर, अालेमा फिरदोस, अालेमा गुलनाज परवीन, यास्मिन कपाडिया अादी उपस्थित हाेत्या.

 

बातम्या आणखी आहेत...