आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात भाजपची सत्ता;शासनाला म्हणावे लागते अधिकारी देता का हो... अधिकारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महापालिकेत भाजपची सत्ता राज्यातही भाजपची सत्ता, पालकमंत्री, शहराचे दोन आमदार, खासदार तरी चार वर्षापासून महापालिकेतील मह्त्त्वाची पदे रिक्त आहे. आता पर्यंत केवळ रिक्त पदे भरण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले. आता तर महापालिकेत केवळ आयुक्त आणि एक साहाय्यक आयुक्त एवढेच महत्त्वाचे अधिकारी राहिले आहेत. त्यामुळेच सत्ताधारी गटाला शासनाकडे 'अधिकारी देता का हो... अधिकारी अशी म्हणण्याची केविलवाणी परिस्थिती आेढवली आहे. 


महापालिकेची हद्द वाढ होऊन दोन वर्ष होत आहेत. २४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेली महापालिका १२५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची झाली आहे. लोकसंख्येत, प्रभागाच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी समस्या आणि कामातही वाढ झाली आहे. हद्द वाढ होण्यापूर्वी महापालिकेत आयुक्त, दोन उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, नगररचनाकार आदी महत्त्वाचे पदे भरल्या गेली होती. मात्र आता राज्यात भाजपची सत्ता येऊन चार वर्षाचा कार्यकाळ लोटला असताना महापालिकेतील मह्त्त्वाची पदे रिक्त आहेत. एवढेच नव्हे तर अतिरिक्त आयुक्त दीपक पाटील यांचीही इचलकरंजी येथे बदली करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे आता सर्व विभागाचा भार हा एकमेव आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यावर आला आहे. शहरात कोट्यवधी रुपयाची कामे सुरु आहेत. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने विकास कामेही रेंगाळली आहेत. विशेष म्हणजे ही पदे शासनाकडून मंजूर आहेत. तर आयुक्त जितेंद्र वाघ यांना सर्वच विभाग, नगरसेवकांच्या समस्या, नागरिकांच्या समस्या आदी चौफेर लक्ष द्यावे लागत असल्याने त्यांच्यावरही कामाचा ताण वाढला आहे. 


उत्पन्नासह कामावर परिणाम
वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे, त्याच प्रमाणे उत्पन्नावरही होत आहे. हद्द वाढ होऊन दोन वर्षाचा कालावधी होत आला असताना या भागातून महापालिकेला अद्याप फारसे उत्पन्न घेता आलेले नाहीत. तर इतर विभागाच्या वसुलीवरही परिणाम झाला आहे. 


मनपा आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
महापालिका आस्थापनेवरील कर्मचारी दर महिन्याला निवृत्त होत आहेत. त्यामुळे अंतर्गत पदेही रिक्त होत आहे. २०१९ ला तर अनेक अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त होणार आहेत. त्यामुळे समस्येत आणखी भर पडणार आहे. 


या महिन्यात अधिकारी रुजू होतील 
महापालिकेतील महत्त्वाच्या रिक्त पदाबाबत नगरविकास विभागाशी चर्चा झाली आहे. या महिन्यात दोन उपायुक्त महापालिकेत रुजू होतील, तर उर्वरित पदेही लवकरच भरली जाणार आहेत.
- विजय अग्रवाल, महापौर 


अधिकारी पाहिजेत, मग तुम्हीच नाव द्या
महापालिकेतील पदाधिकारी रिक्त पदे भरण्याबाबत मंत्रालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करतात. या चर्चेत मंत्रालयातील अधिकारी पदाधिकाऱ्यांना अधिकारी पाहिजेत का, मग तुम्हीच नावे द्या, असे सुचवतात. या प्रकारामुळे महापालिकेतील पदाधिकारीही हतबल झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...