आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई येथील शाखा व्यवस्थापकाचे अपहरण करणारा आरोपी ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणार/ मेहकर- मुंबई येथील एका बँक व्यवस्थापकाचे अपहरण करणाऱ्या एका आरोपीस मेहकर पोलिसांनी शनिवारी १६ जूनच्या रात्री १० वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणातील तीन आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणामागे मुंबई परिसरात मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीचे अपहरण करणारे रॅकेट असल्याची शक्यता आहे. 


मुळचे उत्तर प्रदेशातील परंतु नोकरी निमित्त मुंबई येथे राहणारे बँकेचे सह व्यवस्थापक राजेशकुमार फुलचंद मोर्या हे १५ जून रोजी ९ वाजता आपल्या मांडा टिटवाळा वेस्ट येथील घरी जात असताना पांढऱ्या रंगाच्या एम.एच.०४/ जिडी /७९१२ या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून चार व्यक्तींनी त्यांना पकडून कारमध्ये कोंबले. कासारा येथे मद्रासी बोलणारे देवेंद्र व कालीसा ह्या दोन व्यक्ती कार मधून उतरल्या. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक आरोपी कारमध्ये बसला. दरम्यान काल १६ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे गाडीचा वेग कमी झाल्याने बँक व्यवस्थापक राजेशकुमार मोर्या हे गाडीचा दरवाजा उघडून पळाले. या वेळी त्यांनी रस्त्यावरच असलेल्या डोणगाव पोलिस स्टेशनचा आश्रय घेतला. डोणगाव पोलिसांनी या घटनेची माहिती कंट्रोल रुमला दिली. त्यानंतर कंट्रोल रुमच्या पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ सर्व पोलिस स्टेशनला शोध कार्याच्या सूचना दिल्या. मेहकर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देऊन शोध घेण्याची सूचना केली. या वेळी पो.कॉ.सतीश मुळे यांनी माहिती घेऊन गाडी व व्यक्ती बाबत ठाणेदार आत्माराम प्रधान यांना माहिती दिली. 

 

माहिती मिळताच त्यांनी पो.कॉ.सतीश शिंदे व सतीश मुळे यांना गाडीचा पाठलाग करण्यास पाठवले. सदर वाहन दिसताक्षणी पोलिस कर्मचारी मुळे यांनी वाहन चालकाला हटकले असता आरोपींनी वाहन सुरु करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिस कर्मचारी शिंदे यांनी वाहनाचे स्टेअरिंग व वाहन चालकास पकडून ठेवले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणले. तत्पूर्वी कार मधील तीन आरोपी पळून जाण्यास यशस्वी ठरले. या वेळी ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी ठाणे पोलिसांसोबत संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली असता या घटनेबाबत गुन्हा नोंद असल्याची माहिती ठाणे येथील ए.पी.आय. खोपकर यांनी दिली. आरोपी व गाडी ताब्यात घेण्यासाठी ठाणे येथील पोलिस पथक रवाना झाले आहे. ही कामगिरी ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनात पो.कॉ.सतीश मुळे, पो.कॉ.सतीश शिंदे, पी.सी.अनिल काकडे, एन.पी.सी. श्रीराम निळे यांनी बजावली आहे. वाहनासह वाहन चालकास ताब्यात घेऊन अपहरणकर्त्याचा शोध घेणारे पो.कॉ.सतीश मुळे यांचे विशेष कौतुक होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...