आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता करवाढीला विरोध; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कॉग्रेसच्या वतीने मालमत्ता करवाढ विरोधात २६ फेब्रुवारी रोजी केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील स्वाक्षरी अभियानाला गोरक्षण वासीयांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला. इन्कमटॅक्स चौकात झालेल्या या स्वाक्षरी मोहिमेत हजारो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करीत आपला विरोध व्यक्त केला. हे आंदोलन सुरुच ठेवण्यात येईल, अशी माहिती लूटमार टॅक्स विरोधी संघटनेने दिली. विशेष म्हणजे करवाढ विरोधी आंदोलनाला आता जनाधाराची झालर लागल्याने आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


महापालिकेने उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने मालमत्ता करात प्रचंड प्रमाणात वाढ केली. मालमत्ता करवाढीमुळे चारही बाजूचा आर्थिक बोझा हा सर्व सामान्य नागरिकांनाच बसला. या प्रकारामुळे सर्व सामान्य नागरिक वेठीस धरला गेला आहे. दिव्य मराठीने या अनुषंगाने एप्रिल २०१७ पासून करवाढीचा विषय सातत्याने लावून धरला. यातून विविध राजकीय पक्षांचे आंदोलने सुरु झाली. आंदोलनाला वाढता प्रतिसाद लक्षात घेवून सत्ताधारी गटाने अखेर वाढवलेल्या मालमत्ता करात १८.५२ टक्के कपात केली. दरम्यान या कपाती नंतर पुन्हा करवाढ आंदोलनाने उचल खाल्ली आहे. विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण, डॉ.जिशान हुसेन, शिवसेनेचे राजेश मिश्रा, मंगेश काळे यांनी पत्रकार परिषद घेवून सत्ताधारी गटावर हल्लाबोल करीत आंदोलनाचा इशारा दिला. माजी महापौर मदन भरगड यांनीही मालमत्ता करवाढीचा मुद्दा लावून धरला. यापूर्वी गांधी मार्गावर राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानात हजारो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपला निषेध व्यक्त केला. दुसऱ्या टप्प्यात भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थाना समोर स्वाक्षरी अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी न दिल्याने इन्कम टॅक्स चौकात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. त्यामुळे करवाढ विरोधी वातावरण पुन्हा तापले आहे. 


इन्कम टॅक्स चौकात राबवण्यात आलेल्या अभियानाला नागरिकांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला. संत तुकाराम चौकाकडे जाणाऱ्या येणाऱ्या हजारो नागरिकांनी आपली वाहने थांबवून स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी केली. यात महिला, युवती, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदी सर्वांचाच समावेश होता. या वेळी माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, प्रदेश प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे, लूटमार टॅक्स विरोधी संघर्ष समितीचे अकोला मध्य झोन प्रमुख निकेश गुप्ता, दक्षिण झोन प्रमुख हरिश कटारिया,जिशान हुसेन, सौ. विभा राऊत, भास्करराव पारसकर, सुषमा निचळ, राजेंद्र चितलांगे, गणेश कटारे,कपिल रावदेव, अनंत बगाडे, उमेश इंगळे, प्रदीप वखारीया, विष्णू मेहरे, पंकज जायले, पंकज साबळे,आदी पदाधिका-यांसह हजारो कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी आंदोलनासाठी अथक परिश्रम घेतले. 


महिला, युवतींचा सहभाग 
इन्कम टॅक्स चौकात झालेल्या स्वाक्षरी अभियानातही महिला व युवतींनी चांगला प्रतिसाद दिला. महिला व युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून महापालिकेच्या मालमत्ता करवाढ विरोधात स्वाक्षरी करुन निषेध नोंदवला. 


शहरातील प्रत्येक भागात राबवणार स्वाक्षरी अभियान 
मालमत्ता करवाढ रद्द व्हावी, यासाठी शहराच्या प्रत्येक भागात स्वाक्षरी अभियान राबवण्यात येणार आहे. प्रत्येक भागात स्वाक्षरी अभियान राबवून मालमत्ता करवाढ विरोधाला जनसामान्यांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न सुरु असून स्वाक्षरी अभियानात नागरिकांचाही उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...