आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: स्वच्छतेत महाराष्ट्र दुसरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या शहरांच्या  स्पर्धेत  महाराष्ट्राने गतवर्षीच्या तुलनेत चांगले यश मिळवत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या स्वच्छ शहर सर्वेक्षणाचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात झारखंड राज्याने पहिला क्रमांक पटकावला, तर महाराष्ट्रानेही चांगले यश मिळवले. यानिमित्ताने मुंबई, परभणी, नागपूर, भुसावळ आदी सहा शहरांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणार आहे.

 

या सहा मोठ्या शहरांत राज्याची स्वच्छ राजधानी प्रकारात मुंबई, इनोव्हेशन फॉर बेस्ट प्रॅक्टिसमध्ये नागपूर सर्वश्रेष्ठ, तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकारात नवी मुंबईने नाव कमावले आहे. या मोठ्या शहराबरोबरच सातारा जिल्ह्यातील पाचगणीने स्वच्छ शहर, नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जनाघाटने दुसरा क्रमांक, तर नावीन्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी प्रकारात  पुणे सासवडने यश संपादन केले.  


४ जानेवारी ते १० मार्चदरम्यान जगातील सगळ्यात मोठे सर्वेक्षण स्वच्छतेच्या बाबतीत भारतात झाले. ४२०३ शहरांत स्वच्छ शहर कोणते याचा शोध या माध्यमातून घेतला गेला.  त्यासाठी ही स्पर्धा चालली ९४००० घरांमध्ये. दारादारांत जाऊन कचरा व्यवस्थापनाची पाहणी करण्यात आली. ४६००० निवासी वस्त्या, २८००० व्यावसायिक क्षेत्रे, २५००० शाळा,  २५००० प्रोसेसिंग युनिट आदींची तपासणी या सर्वेक्षणांतर्गत करण्यात आली. ३७.६६ लाख लोकांना यासंदर्भात बोलते केले गेले. ५३.५८ लाख स्वच्छता अॅप या स्पर्धेसाठी डाऊनलोड झाले होते.  १.१८ कोटी नागरिकांनी त्यात सहभाग नोंदवत आपले म्हणणे, तक्रारी व्यक्त केल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर केल्या गेलेल्या पाहणीनंतर हे निकाल जाहीर केले गेले.  सबंध देशात सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सलग दुसऱ्या वर्षी पहिला क्रमांक कायम ठेवला असून त्यापाठोपाठ भोपाळ आणि चंदिगड शहरांचा क्रमांक लागतो.  


स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या देशातील ४३४ शहरांची क्रमवारी गेल्या वर्षी जाहीर झाली होती. त्या वेळी या यादीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची घसरण झाली होती. स्वच्छ शहरांच्या यादीत २०१६ मध्ये घोषित केलेल्या ७३ शहरांच्या यादीत आघाडीच्या ५० शहरांत महाराष्ट्रातील ८ शहरांचा समावेश होता.  नंतर एकाच वर्षात हा आकडा ३ पर्यंत खाली आला होता. त्या वेळी महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छ करण्याची मोहीम गांभीर्याने घेतल्याचे आणि स्वच्छतेबाबत ही शहरे आणि राज्ये जास्त सतर्क असल्याचे सिद्ध होते. तो डाग या वर्षी महाराष्ट्राने पुसून काढत देशात दुसरा क्रमांक पटकावला. आणि राज्यातील ९ शहरांनी आम्ही मागे नाहीत हे सिद्ध केले.  


महात्मा गांधींच्या १५० व्या जन्मशताब्दीनिमित्त २ ऑक्टोबर २०१४ राेजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली आणि या अभियानाला देशव्यापी चळवळीचे स्वरूप दिले. स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन देशवासीयांना केले.  पक्षभेद बाजूला ठेवत पहिल्यांदा आपल्या परिसरातील स्वच्छतेसाठी अनेक लोक रस्त्यावर उतरले. विविध संघटनांनी पुढाकार घेत मोहिमा उघडल्या. त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे. वरचेवर या मोहिमांत वाढही होत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत इतर देशाचे कौतुक करत आपल्या देशातील अस्वच्छते बाबत आपणच नकारात्मक चर्चा करायचो. बदल घडावा असे सगळ्यांनाच वाटायचे पण तो करण्यासाठी पुढाकार कोण घेणार हा प्रश्न कायम असायचा.

 

किमान या अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक माणूस या संबंधात बोलत, कृती करत आहे. संबंधित यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. २०१९ पर्यंत देश स्वच्छ करण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून मांडण्यात आला. सामूहिक, सार्वजनिक शौचालयाची उभारणी, खुल्या जागेवर शौचविधीपासून लोकांना रोखणे, घनकचरा व्यवस्थापन, कचरा गोळा करणे, त्याची सफाई, कचरा प्रक्रिया, विल्हेवाट आदी बाबींचा यात समावेश आहे. देशातील सर्व शहरांतील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात हे अभियान राबवण्यास सुरुवात केली. स्वच्छ, सुंदर पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वच राज्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.  


वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून आज आपण प्रत्येक जणच या स्वच्छ भारत अभियानासाठी आपले योगदान देत आहे. पण केवळ तेवढ्यावर हा प्रश्न मिटणार नाही. जो पर्यंत प्रत्येक जण आपल्या आणि आजुबाजूच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी   सतर्क होणार  नाही, आपल्या सवयी बदलून प्रत्येक जण एक राष्ट्रीय कार्य म्हणून या योजनेत सहभागी होणार नाही तोपर्यंत स्वच्छ सुंदर भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही.

 

-सचिन काटे

 कार्यकारी संपादक, अकोला

बातम्या आणखी आहेत...