आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी शाळांतील मुलांची सुरक्षा धोक्यात; दुर्लक्ष, शिक्षण विभागाने गंभीर दखल घेण्याची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरात पाच महिन्यांपूर्वी माउंट कारमेल इंग्लिश स्कूलमध्ये दुसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी पडल्याने त्याचे ब्रेन हॅमरेज झाले होते. त्यानंतर पातूर रोडवरील अली पब्लिक स्कूलमधील एलकेजीच्या विद्यार्थांचा झालेला अपघाती मृत्यू या पाच महिन्यांतील दोन घटनांमुळे खासगी शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांकडून भरमसाट फी घेणाऱ्या शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केली जात नाही, शिक्षण विभागांचे अशा शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याने मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. 


मुलांचा सर्वाधिक वेळ हा पालकांपेक्षा शिक्षकांच्या सानिध्यात अधिक असतो. त्यामुळे साहजिकच मुलांच्या सुरक्षेची काळजी ही शाळांवर येते. बहुतांश शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी वेगळी काहीच व्यवस्था नसते. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, मुलांना आणि मुलींना वेगळे बाथरूम नाहीत, शाळेच्या गेटवर सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे. शाळेच्या इमारतीचे दरवर्षी ऑडिट करणे, शाळेतील अग्निशमन व्यवस्थेचे नूतनीकरण केल्या जात नाही. खासगी शाळा हे नियम पायदळी तुडवतात आणि त्याचा परिणाम शाळेतील मुलांना भोगावा लागतो. खासगी शाळांमध्ये काय सुरु आहे. या शाळांमध्ये नियमाचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी शिक्षणाधिकारी शाळांना कधी आकस्मिक भेटी देत नाहीत. या संधीचा गैरफायदा घेत खासगी शाळा व्यवस्थापनाची मनमानी मात्र सुरु बहुतांश खासगी शाळा संस्थानिक बनल्याचे दिसून येत आहे. 


पालकांना कळवले जात नाही
मुले सकाळी शाळेत जातात. पाच-सहा तास ते शाळेमध्ये असतात. खेळताना मुले पडतात. अशावेळी त्यांच्या डोक्याला मार लागल्यास किंवा गंभीर जखम झाल्यास शाळांनी पालकांना कळवणे आवश्यक असते. मात्र शिक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी वेळेवर उपचार मिळत नसल्याने मुलांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. 


पालकांना पडलेले काही प्रश्न? 
- शिक्षणाधिकाऱ्यांनी वर्षातून किती खासगी इंग्रजी शाळांना आकस्मिक भेटी दिल्यात? 
- विद्यार्थी- पालकांशी शिक्षणाधिकाऱ्यांनी कितीदा संवाद साधला? 
- शाळांमध्ये पालकांच्या मिटींग होतात काय? त्याविषयी स्वत: शिक्षणाधिकारी यांनी कधी क्रॉसचेक केले का? 
- स्कूलबसची तपासणी आरटीओ विभाग वेळोवेळी करतो काय? 


तळमजल्याऐवजी जीना चढून वरच्या मजल्यावर भरतात चिमुकल्यांचे वर्ग 
केजी, पहिला वर्ग, दुसरा वर्गातील विद्यार्थांचे वर्ग हे तळमजल्यावर असायला हवे. मात्र बहुतांश शाळांमध्ये वरच्या मजल्यावर वर्ग आहेत. विद्यार्थांना पायऱ्या चढ-उतार कराव्या लागतात. शाळासुटल्यानंतर तसेच मधल्या सुटीत विद्यार्थांची गर्दी होत असल्याने पायऱ्यावर घसरून पडण्याच्या घटना नेहमीच होतात. मात्र त्याचे शाळांना काही देणेघेणे नसल्याचे दिसून येते. 


अकोल्यातील अली पब्लिक स्कुलमध्ये एलकेजीचा विद्यार्थी मिर्झा अहमद रझा हा २३ फेब्रुवारी रोजी शाळेत पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.शाळेने पालकांना कळवले नाही.योग्य वेळी उपचार न झाल्याने घरी आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणाची सखोल चौकशी करून मृतक चिमुकल्याला न्याय द्यावा, या मागणीसाठी सोमवारी सायंकाळी फतेह चौक ते महाराणा बागेपर्यंत कॅण्डल मार्च काढण्यात आला. 


बहुतांश स्कूलबसमध्ये चढ-उतार करण्यासाठी मदतनीसच नाहीत 
शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी स्कूलबसमध्ये बसतात. त्यांचा स्टॉप आल्यानंतर ते उतरतात. विद्यार्थांना घरी जायची घाई असल्याने ते थेट रस्त्यावर चालायला लागतात. अशावेळी त्यांना घराचा रस्त्यावर लावणे ही स्कूलबसची जबाबदारी आहे. मात्र ती जबाबदारी पालकांवर झटकून शाळा व्यवस्थापन मोकळे होत असल्याचे दिसून येत आहे.

 
१० वीच्या व केजीच्या मुलांना एकच डेस्कबेंच 
अनेक शाळा दोन पाळ्यांमध्ये भरतात. सकाळी केजीचे वर्ग भरलेल्या वर्गखोलीत दुपारी ८-१०चे वर्ग भरतात. या वर्गातील डेस्कबेंच हे केजीच्या विद्यार्थांना किती सोयीस्कर असतील, असा प्रश्न कधी शिक्षणविभागाला पडत नाही. लहान मुलांना शाळेच्या वेळात उभे राहूनच लिहावे लागते. याकडे डोळेझाक होत असल्याने त्याचे कुणालाही सोयरसूतक नाही. मात्र त्या चिमुकल्यांवर शाळा एकप्रकारे अत्याचार करीत आहेत. 


५ महिन्यांत घडल्या २ घटना 
पाच महिन्यांपूर्वी कारमेल शाळेत एक विद्यार्थी पडला होता. तो बेशुद्ध झाला होता. मुलाच्या पालकांना तत्काळ न कळवल्याने तो सिरीयस झाला होता. तर दुसरी घटना २७ फेब्रुवारी रोजी अली पब्लिक स्कूलमध्ये घडली. पालकांच्या म्हणण्यानुसार चिमुकला शाळेत पडला. तेथे त्याला दोन-तीन उलट्याही झाल्या. मात्र शाळेने पालकांना काहीही माहिती दिली नाही. डोक्यात रक्त गोठत गेल्याने आणि उपचाराला उशिर झाल्याने मुलाचा मृत्यू झाला. 


आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची पालकांना अपेक्षा 
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित आहेत. अनेक शाळांमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप पालकांचा आहे. हे सर्व प्रकार कागदाबरोबरच प्रक्टिकलमध्ये आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून विद्यार्थांच्या सुरक्षेला न्याय द्यावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...