आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडे सातशे वारकऱ्यांसंगे श्रींची पालखी पंढरपूरकडे झाली रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव- शेगावीचा राणा माहेरी निघाला, संगे संत मेळा भजनी रंगला, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे, तुका म्हणे ऐसे आर्त ज्यांचे मनी, त्यांची चक्रपाणी वाट पाहे. संतनगरी शेगाव येथुन आज १९ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या ब्रम्हमुहूर्तावर ७५० वारकरी भक्तांसंगे श्री गजानन महाराजांची पालखी विठ्ठलाच्या पंढरीकडे मार्गस्थ झाली. 


यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याची पुजा करण्यात आली. त्यानंतर संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील, अध्यक्ष नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, डॉ. रमेशचंद्र डांगरा, किशोर टांक, अशोकराव देशमुख, विश्वश्वर त्रिकाळ, पंकज शितुत, प्रमाणे गणेश आदींची उपस्थिती होती. तद्नंतर श्रींचा रजत मुखवटा पालखीत संस्थानचे पुजारी वर्गाने स्थापन केला. जय गजानन श्री गजाननाच्या नामघोषाने सर्वत्र भक्तीयम वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी श्रींच्या पालखीचे विधीवत पुजन करुन दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात श्रींच्या पालखीला निरोप देण्यासाठी शहरासह पंचक्रोशीतील भक्त मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यानंतर श्रींची पालखी रथ, मेणा, गज, अश्व, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, इत्यादी शेकडो वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरसाठी पुढे पडत होती. श्रींची पालखी संस्थानच्या प्रांगणातुन श्री भक्त वै. बाळाभाऊ महाराज, वै. नारायण महाराज यांच्या समाधी मंदिराजवळून संस्थानचे प्रसादालय भक्त, श्री गणाचार्य महादेव संस्थान, श्री गोरोबा काका मंदिर तेलीपुरा, श्रींचे प्रकटस्थळ येथे पालखी पोहोचली. यावेळी फराळाचे वाटप करण्यात आले. नंतर श्री शितलनाथ महाराज संस्थान जवळुन देशमुख यांचे मळ्यात चहा पाणी घेवुन नागझरीकडे रवाना झाली. 


श्रींच्या पालखीचा प्रवास : श्री संत गजानन महाराजांची पालखी ३३ दिवसांचा पायी प्रवास आणि ७५० किमीचे अंतर कापूर २१ जुलै रोजी पंढरीच्या पावन भुमित दाखल होणार आहे. तर येथुन २७ जुलै रोजी परतीचा प्रवासाला प्रारंभ होणार आहे. सुमारे ५५० किमीचा पायी प्रवास केल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी शेगावी पोहोचणार आहे.

बातम्या आणखी आहेत...