आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलाटावर उभी बस मनोरुग्णाने केली सुरू, थोडक्यात टळला अनर्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पुसदला जाणारी बस फलाटावर उभी होती. प्रवाशी बसमध्ये चढत असताना एक युवक बस चालकाच्या खुर्चीत बसला व त्याने बस सुरु केली. बस मागे पुढे करीत असताना प्रवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. एक प्रवाशी लगेच कॅबिनमध्ये घुसला आणि त्याने ब्रेकवर पाय दिल्याने अनर्थ टळला अन्यथा बस पुढे सरकली असती तर कित्येक प्रवाशी चिरडल्या गेले असते. बसचालकांच्या अक्षम्य चुकीमुळे हा प्रसंग घडला.

 

बस उभी केल्यानंतर बस चालकाने बसची चावी काढली नाही. ती तशीच ठेऊन तो नियंत्रकाच्या कॅबिनकडे गेला. या दरम्यान डाबकी रोड येथील साई नगरात राहणारा रजाखान नवाबखान हा बसच्या कॅबिनमध्ये चढला. त्याने बस सुरु केली.


बस -मागे पुढे झाल्याने प्रवाशांना जोरदार झटका बसला. हा बसचा चालक नसल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. इतक्यात वाहन चालवण्याची माहिती असलेला एक प्रवाशी प्रसंगावधान राखत कॅबिनमध्ये घुसला. त्याने एसटीचा ताबा घेतला. त्यानंतर बसचा चालक वाहक आले त्यांनी रजाखानला बाहेर काढले आणि पोलिसांच्या हवाली केले. जर बस मागे किंवा पुढे गेली असती तर बसस्थानकावर असलेल्या प्रवाशांना तिने चिरडले असते. मात्र सुदैवाने हा प्रसंग टळला आणि प्रवाशी व बसस्थानकावरील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

 

चालकांचा अक्षम्य हलगर्जीपणा
अकोला बसस्थानकावर पोहोचल्यानंतर बसचालकाने बसची कॅबीन उघडी ठेवली व चावी तशीच लावून ठेवल्याने मनोरुग्ण बसमध्ये चढू शकला. वृत्त लिहिस्तोवर संबंधित बसचालकावर एसटी विभागाने कोणतीही कारवाई केली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...