आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खतीब यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी; बाळापूर नागरी पतसंस्थेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- बाळापूर नागरी पतसंस्थेत कोट्यवधीच्या रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी २७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. खतीब यांच्यासह १३ संचालकांची २२ खाती आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच सील केली आहेत. माजी आमदार खतीब यांनी ठेवीदारांचा विश्वासघात केला, त्यावरून आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्यासह १३ संचालकांवर महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझीटर्स (इन फायनांसीयल एस्टॅब्लिशमेंट) अॅक्ट (एमपीआडी अॅक्ट) १९९९ च्या कलम ४ नुसार, विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 


आर्थिक गुन्हे शाखेने बाळापूर पतसंस्थेतील सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली व सखोल चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर पतसंस्थेच्या संचालकांचे बँक खाते सील करण्याच्या सूचना संबंधित बँकांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व संचालकांच्या नावावर असलेल्या संपत्तीवर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यावर प्रतिबंध घातला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. नातिकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालक या प्रकरणात अद्यापही फरार आहेत. माजी आमदार खतीब यांच्यासह १३ संचालकांनी अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. आता न्यायालयात आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होतो की फेटाळल्या जातो, याकडे ७०० ठेवीदारांचे लक्ष लागून आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी किसन गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश अणे करीत आहेत. 


तक्रारदार रामदास पराते यांच्या तक्रारीवरून १६ फेब्रुवारी रोजी माजी आमदार तथा पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. सै. नातिकोद्दीन सै. हुसामोमद्दीन खतीब, शाम सखाराम शेगोकार, रजीया बेगम सै. नातीकोद्दीन खतीब, सै. हमिद्दोनी सै. जमीदोद्दीन, नंदकिशोर दामोधर पंचभाई, मो. हनीफ अब्दुल मुनाफ, निजामोद्दीन शफीद्दीन , गफारली रेहमानजी रंगारी, सै. मुजीबुर रहेमान सै. हबीब, निर्मलाताई श्रीकृष्ण उमाळे, शे. महेमूद शे. हसन, शे. मुनीर शेख व शेख वजीर, शेख इब्राहिम या पदाधिकारी व संचालकांवर गुन्हे दाखल आहेत. 


दोन हजारांची लाच; कंत्राटी सहायक जाळ्यात 
शेतकऱ्यास सिंचन विहीर मंजूर झालेली आहे. त्यांनी विहिरीचे काम पूर्ण केल्यानंतर झालेल्या कामाची देयके व मजुरांचे वेतन मिळण्यासाठी अर्ज केला होता. यावर अकोट पंचायत समितीचा लाचखोर कंत्राटी तांत्रिक सहायक शिवकुमार ज्ञानेश्वर भोरे याने शेतकऱ्याला दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला एसीबीकडे केली. 


यावरून एसीबीचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात २ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक भोरे याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर सोमवारी अकोट पंचायत समितीजवळ असलेल्या झाबर देवराव चौधरी यांच्या हॉटेलमध्ये सापळा लावण्यात आला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम घेऊन भोरे याने शेतकऱ्यास बोलावले. त्यानंतर शेतकऱ्याने दोन हजार रुपयांची रक्कम देताना शिवकुमार भोरे या लाचखोर कर्मचाऱ्यास दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई अकोला एसीबीचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात गाडगे, सुनील राऊत यांनी केली. 

 

गुन्हे दाखल होताच आरोपी झाले फरार 
बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर, आर्थिक गुन्हे शाखेने माजी आमदार अॅड. सैय्यद नातिकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...