आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात, चार जण ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील वऱ्हाडी लग्नासाठी अकोल्यात मिनीट्रकने येत असताना राष्ट्रीय महामार्गावर कान्हेरी-व्याळा नजीक अंबुजा फॅक्टरीजवळ समोरून आलेल्या एसटी मेटॅडोरमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये चार वऱ्हाडींचा मृत्यू झाला, तर बस मिनीट्रकमधील ४० जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे येथे शोककळा पसरली.
धामणगाव बढे येथील हरिभाऊ दगडू काटे यांचा मुलगा राम याचे लग्न आज मंगळवारी अकोला येथील वासुदेव नथ्थूजी मोरे यांची मुलगी अश्विनी हिच्यासोबत ठरले होते. लग्नामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते. लग्नासाठी नवरदेवाचे नातेवाईक दोन दिवसांपासूनच त्यांच्या घरी आले होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी रिमझिम पावसात नानमुखाचा कार्यक्रम आटोपून मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास काटे परिवार नातेवाईक असे एकूण ३१ वऱ्हाडी एमएच ४३ बी ८४६९ या क्रमांकाच्या मिनीट्रकने अकोला येथे लग्न लावण्यासाठी निघाले. खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील मालवा ढाब्याजवळ येताच भरधाव मिनीट्रक समोरून भरधाव येणाऱ्या एमएच २० बीएल २२१२ क्रमांकाच्या अकोला ते अंबड या बसची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात एसटीच्या कॅबिनचे दोन भाग झाले. मिनीट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. या अपघातात मिनीट्रकमधे बसलेले अरुण तुकाराम काटे वय ४० वर्षे, प्रभाकर शंकर गवळी वय ४० वर्षे, रवींद्र मोतीराम शहाणे दीपक अर्जुन लेनेकर हे चार वऱ्हाडी जागीच ठार झाले असून, २७ वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना रुग्णवाहिका इतर वाहनाने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. जखमी झालेल्या वऱ्हाडींमध्ये धामणगाव बढे येथील ईश्वर प्रल्हादराव वाघ वय २९, कैलास वसंत जैन वय २९, अमोल अरविंद रेंगे वय २८, बंटी खांदे वय २५, संजय रमेश खांदे वय ३०, आनंद काटे, गजानन दडवी, गजानन सहाने वय २७, सुनील प्रकाश लवंगे वय २३, ज्ञानेश्वर सपकाळ, विनायक सपकाळ, नीलेश भगवान वाघ, रवी तुकाराम काटे, सचिन हरी काटे वय ३०, श्रावण दगडू काटे वय ५४, शंकर रामा दवंगे वय ५५, मंगेश दिवाकर वडे वय २२, भूषण नारायण खांदे वय १९, हरी दगडू काटे वय ६३, सागर रवींद्र काटे वय २४, प्रमोद बोरसे वय ३५, किशोर प्रल्हाद वाघ, मोहीन बदरुद्दीन, रघुनाथ लवंगे वय ४०, विनोद सपकाळ, पोफडी येथील पंढरी बोरसे, धामणगाव बढे येथील अस्लम खान रशीद खान यांचा समावेश आहे. अपघातस्थळी अकोल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर दाखल झाले होते. या वेळी बाळापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, अकोला येथील समाजसेवक पराग गवई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तरुण बगेरे यांनी जखमींना तत्काळ उपचार मिळवून देण्यासाठी धावपळ केली.

लग्नासाठी वेळेवर आले असते तर...
लग्नाची वेळ सकाळी ११.३० वाजताची होती. मात्र, वऱ्हाडी धामणगाव बढे येथूनच उशिरा निघाले. ते १२ वाजता अकोल्यापासून १२ किमी अंतरावर होते. लग्नासाठी ते एक तास उशिराने पोहोचणार होते. त्यासाठी निश्चितच त्यांच्या वाहनाचा वेग जास्तच असेल. हा वेग कव्हर करण्यासाठी मिनीट्रक भरधाव येत होता. त्यामुळे अपघात झाला असावा, कदाचित वेळेवर जर लग्नस्थळी पोहोचले असते तर दुर्घटना टळली असती.

बसमधील जखमीत चिमुकल्यांचा समावेश
संतोष तुकाराम पैठणे वाहक, आर. बी. शेरेकर चालक, प्रवासी संदीप सुरेशराव पळसपगार रा. डाबकी रोड, कुसुम सहदेव जाधव रिधोरा, शेख मोईन मो. अली रा. हमजा प्लॉट बायपास, प्रकाश किसनराव खुळे रा. खामगाव, लोणीकाळे जि. बुलडाणा येथील राणी परवीन मुश्ताक खान पठाण २५, चिमुकल्यांमध्ये हुजेल खान मुश्ताक खान पठाण १८ महिने, मिशन खान मुमताज खान पठाण वर्ष, लजीनाबी मुमताज खान पठाण वय वर्ष, अंबड येथील शिवाजी घोडके ३५, स्वाती घोडके वय ३३, रा. अंबड यांचा जखमीत समावेश आहे.

उलट्या झाल्यामुळे वाचला नितेशचा जीव
नितेश शंकर बढे हा युवकसुद्धा इतर वऱ्हाडींसोबत मिनी ट्रकमध्ये होता. परंतु, मधातच त्याला उलट्या होत असल्याने तो मोताळा येथे उतरून घरी परतला. त्यामुळे तो वाचला.

बसचा सुरक्षित प्रवास झाला असुरक्षित
एसटी बसला वेगमर्यादा ठरवून दिली आहे. मात्र, बसचे चालक वेगमर्यादेचे उल्लंघन करतात. त्यामुळे अनेक अपघात अति वेगात असल्यामुळेच झाले. त्यावर एसटी महामंडळाकडून कोणतीही कारवाई होत नाही.

बातम्या आणखी आहेत...