अकोला - कंटेनरला अडवून त्याला लुटण्याचा प्रयत्न करीत असलेल्या युवकाच्या अंगावरच चालकाने कंटेनर घातला. या धडकेत युवक दूर फेकला गेला. मात्र त्याच्या कमरेत लपवलेल्या चाकूनेच त्याचा घात केला. या घटनेत त्याचा मित्र बचावला. ही घटना नवीन हिंगणा शिवारातील हायवे रोडवर शनिवारी पहाटे ३.३० वाजता घडली.
शेख मतीन शेख कलीम (वय २३ रा. नायगाव) असे मृतक युवकाचे नाव आहे. शेख मतीन हा मित्र शेख चॉद शेख गुलाब सह रात्री ११.३० वाजता सैलानीवरून एमएच ३० आर ७८ ०३ क्रमांकाच्या दुचाकीने अकोल्याकडे येण्यासाठी निघाले होते. दोघेही रात्री २.३० वाजताच्या दरम्यान नायगावात पोहोचले. त्यानंतर शेख मतीन शेख चाँद हे दोघेही रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास नवीन हिंगणा शिवारातील हायवेवर पोहोचले. यावेळी शेख चॉद हा रोडच्या बाजूला उभा राहिला. तर शेख मतीनने दोन चाकू कमरेत लपवले रस्त्यात दुचाकी घेऊन उभा राहिला. यावेळी बाळापूर कडून आलेल्या कंटेनरने त्याला धडक दिली. त्यात तो खाली पडला. त्यावेळी त्याच्या कमरेत लपवलेल्या चाकूने त्याला डावे खांद्यावर, डावे जांघेवर डाव्या पायावर मार लागून गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शेख चॉद याच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे कलम २७९ ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक श्याम तायडे यांनी तपास केल्यानंतर अपघाताच्या या घटनेची वेगळीच कहाणी समोर आली आहे.
मतीनचाभाऊ सलीम शेख चाँदने नेेले त्याला रुग्णालयात : मतीनलाकंटेनरने उडवल्यानंतर त्याच्याच मोबाईलने शेख चाँदने त्याचा भाऊ शेख सलीम याला बोलावून घेतले दोघांनी त्याला १०८च्या अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात भरती केले.
बयाणावरून आले वास्तव समोर
मृतकाचा मित्र शेख चाँद याने पोलिसांना दिलेल्या बयाणावरून अपघाताच्या घटनेचा उलगडा झाला आहे. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली मात्र नंतर पोलिस उपनिरीक्षक श्याम तायडे यांना हकिगत सांगितली. मला खर्चायला चार, पाचशे रुपये देतो, असे म्हणून शेख मतीन घेऊन गेला. त्यानंतर तो ट्रक चालकांना अडवून लुटतो हे मला माहित झाल्याचे बयाण त्याने पोलिसांना दिले. या घटनेचा माझा काही संबंध नसल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.