आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोन बँक कर्मचारी ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळापूर - राष्ट्रीयमहामार्गावर असलेल्या व्याळा येथील बसस्थानकाजवळ ट्रक दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी जवळपास चार तास महामार्ग बंद केला होता.
व्याळा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत कार्यरत असलेले शाखाधिकारी प्रदीप बाजड कॅशिअर अमोल गावंडे हे दोघे आज सकाळी व्याळा बसस्थानकाजवळ पोहोचले होते. त्यानंतर व्याळा गावाकडे दुचाकी वळवत असताना समोरून वाळूने भरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच २७ एक्स १६०१ ने या दुचाकीस धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकी ट्रकमध्ये फसल्याने जवळपास ५० फूट घासत गेली. त्यासोबतच दुचाकीवरील प्रदीप बाजड हेसुद्धा घासत गेले. या अपघातामध्ये अमोल गावंडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर प्रदीप बाजड हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथे नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महामार्गावर चक्काजाम केला. गावातील सर्व नागरिक रस्त्यावर उतरून त्यांनी महामार्गावर गतिरोधक उभारण्याची मागणी केली. गतिरोधक उभारल्यास मृतदेह उचलू देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर गावातील सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी जमावाची समजूत काढल्यानंतर जवळपास चार तासानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे ठाणेदार मिर्झा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विशेष पोलिस पथकालासुद्धा पाचारण करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...