आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकने दिली स्कूटीला धडक; युवतीचा जागेवरच मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - परीक्षा देण्यासाठी शिवाजी महाविद्यालयात जात असलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनी आरतीच्या स्कूटीला ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामध्ये आरतीच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १.१० वाजता रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यासमोर घडली. गेल्या दोन महिन्यांतील ही अपघाताची दुसरी घटना आहे.

आरती ईश्वरसिंग ठाकूर रा. गुरुकुलनगरी, मलकापूर असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. ती तिरुपती तंत्रनिकेतन महाविद्यालयात बीसीएच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. बीसीएची परीक्षा सुरू असल्यामुळे तिला शिवाजी कला महाविद्यालय हे परीक्षेचे केंद्र मिळाले होते. शुक्रवारी दुपारी वाजताचा पेपर असल्यामुळे ती डाटाबेस मॅनेजमेंंंट सिस्टम विषयाचा पेपर देण्यासाठी घरून एक वाजेपूर्वी पेपरला निघाली होती. दुपारी वाजून १० मिनिटांनी ती रेल्वे मालधक्क्यावरून तिच्या एमएच ३० एसी ८३९९ क्रमाकांच्या स्कूटीने जात होती. दरम्यान, तिच्या मागून आलेल्या भरधाव ट्रकने तिला उडवले. यामध्ये आरती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. तत्काळ तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात अाले. मात्र, तिची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी ट्रकचालक साेमाभाई मनाभाई शर्मा, वय २९ रा. पाटण, राज्य गुजरात याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मालधक्क्यामुळे असते कायम वर्दळ
रेल्वेस्थानकपरिसरात मालधक्का असल्यामुळे येथून ट्रकची ये-जा सुरू असते. त्यामुळे दुचाकीधारकांना येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे हे स्थळ अपघातप्रवण स्थळ आहे. मालधक्का शहराबाहेर जाण्याच्या हालचाली जरी सुरू असल्या तरी तत्काळ मालधक्का शहराच्या बाहेर हलवण्याचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

ठाकूर दाम्पत्यांना दोन मुली
ईश्वरसिंग ठाकूर हे अकोला पोलिस दलात कार्यरत होते. ते नुकतेच मुख्यालयातील डीएसबीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना दोन मुली असून, आरती ही धाकटी, तर थोरली मुलगी अमरावती येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. आरतीच्या दु:खद निधनामुळे ठाकूर दाम्पत्य सैरभैर झाले असून, हळहळ व्यक्त हाेत अाहे.

सहा महिन्यांपासून पाइपलाइन लिकेज आहे. या पाण्यातून दुचाकी गेल्यामुळे ती स्लीप झाली, असे अपघातस्थळाशेजारी असलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या ठिकाणी अनेक जण पडले असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. येथे पाइपलाइन फुटली असल्याचे वारंवार सांगूनही ती दुरुस्त केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

आरतीच्या आईने फोडला टाहो..
आपली मुलगी परीक्षेला गेली आहे. सायंकाळी घरी येईल, असा विचार आरतीच्या आईने करणे स्वाभाविक आहे. मात्र, दुपारी वाजताच्या सुमारास रामदासपेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुभाष माकोडे यांनी आरतीला रुग्णालयात आणल्यानंतर तिच्या मोबाइल फोनवरून तिच्या घरी फाेन लावला. या वेळी आरतीच्या आईने फोन उचलला. त्यावर तुमच्या मुलीचा अपघात झाला आहे, सर्वोपचारमध्ये कुणाला तरी पाठवून द्या, असे सांगितले. त्यानंतर लगेच आरतीची बहीण आणि त्यानंतर आई पोहोचली, आरतीचा मृत्यू झाल्याचे कळताच तिच्या आईने सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षाच्या पायऱ्यांवर लोटांगण घेत डोके आदळत आरती... आरती... म्हणून आक्रोश करत टाहो फोडला. या वेळी बघणाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते.

एन्ट्रीची अन् अपघात वेळेची व्हावी चौकशी
एक वाजतानंतर जड वाहनांना परवानगी आहे. हा अपघात दुपारी १.१० मिनिटांनी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा ट्रक बाळापूर नाक्याहून रेल्वे स्टेशनमार्गे अंजनगावला जात होता. त्यामुळे अपघात जर १.१० मि. झाला असेल, तर बाळापूर नाक्याहून रेल्वेस्थानकापर्यंत यायला १० मि. लागतात काय, अन् लागत नसतील तर वाजेपूर्वी हा ट्रक चार मुख्य चौक ओलांडून आला कसा, त्याला अडवले का नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अपघाताच्या वेळेची ट्रकच्या एन्ट्रीची चौकशी हाेणे गरजेचे अाहे.

२९ सप्टेंबर रोजी बसस्थानक चौकात ट्रकने महिलेला चिरडले होते. या घटनेनंतर पोलिसांनी काही दिवस जड वाहतुकीला लगाम लावला होता. मात्र, पुन्हा शहरातून भरधाव ट्रक ये-जा करत असल्यामुळे अशाच एका ट्रकने आरतीचा जीव घेतला.