आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरणाची दुचाकीला धडक, दोन जखमी- हरणाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोताळा- रस्तापार करणाऱ्या एका हरणाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुचाकीवरील दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींपैकी एका जणाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना सोमवारी २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास मलकापूर बुलडाणा रोडवरील वन चौकीजवळ घडली.

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील नळकुंडचे माजी पोलिस पाटील गाेरसिंग रणजित ब्राम्हण वय ६० खैरखेड येथील भिका घोती हे दोघे एमएच २८ एई १३१० या क्रमांकाच्या दुचाकीने मोताळ्याकडे येत होते. दरम्यान बोराखेडी शिवारातील वन चौकीजवळ येताच त्यांच्या दुचाकीला रस्ता पार करणाऱ्या मादी हरणाने जबर धडक दिली.

ही धडक एवढी जबरदस्त होती की, या अपघातात हरणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी स्लीप झाल्याने दुचाकीवरील दोघेही जखमी झाले आहेत.

हा अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील जखमींना बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात हलवले. परंतु गोरसिंग ब्राम्हण यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर तब्बल एका तासाने वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलिस करत आहेत.