आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातधर्म घरी ठेवा अन् ‘खाकी’चा धर्म पाळा, अप्पर पोलिस महासंचालकांचा संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्य तुमची आतुरतेने वाट पाहतेय, चांगली सेवा द्या. महाराष्ट्र पोलिसाला गालबोट लागेल, असे काम करू नका. आता जातधर्म घरी ठेवा आणि केवळ खाकीचा धर्म पाळा. कारण आजपासून तुमचा खाकी धर्म आहे, असा संदेश अप्पर पोलिस महासंचालक व्ही.व्ही. लक्ष्मीनाराण यांनी पोलिस शिपाई म्हणून बाहेर पडलेल्या राज्यभरातील ३८६ प्रशिक्षणार्थींना दिला. ते मंगळवारी पोलिस प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत संचलन समारोहात बोलत होते. 
 
सत्र क्रमांक ६० च्या पोलिस प्रशिक्षणार्थी दीक्षांत संचलन समारोहात पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी मानवंदना स्वीकारली परडेचे निरीक्षण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण केंद्रात प्राप्त केलेल्या ज्ञानाचा पुर्णपणे वापर करून जनतेस सेवा द्यावी, आदर्श माणूस आदर्श पोलिस म्हणून नावलौकिक मिळवावा आपल्या कृतीने पोलिस दलाची प्रतिमा उचावेल अशी वागणूक ठेवण्याबाबत मार्गदर्शन करून, जनतेची सेवा प्रामाणिकपणे तत्परतेने कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली. परेड कमांडर, प्रशिक्षणार्थी कृष्णात माने सेकंड इन परेड कमांडर, प्रशिक्षणार्थी सागर पाटील यांचे नेतृत्वात शिस्तबद्ध उत्कृष्ट कवायत संचलन सादर केले. त्याच बरोबर पोलिस प्रशिक्ष्णार्थी यांनी विविध चित्तवेधक रोमहर्षक प्रात्यक्षिके सादर केली. 
 
प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. बी.जी. शेखर यांनी अहवाल वाचन केले. त्यात त्यांनी म्हटले की, १९७० साली प्रशिक्षण केंद्र स्थापन झाल्यापासून या प्रशिक्षण केंद्रात सदर सत्र क्रमांक ६० मधील प्रशिक्षणार्थींसह २४ हजार २१५ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले असल्याची माहिती दिली. यंदाच्या सत्र क्रमांक ६० चा निकाल ९८.२१ टक्के लागल्याचे नमूद केले. प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थींना देण्यात येणाऱ्या मुलभूत प्रशिक्षणासोबतच प्रशिक्षणार्थींच्या सर्वांगिन विकासासाठी आयोजित करण्यात आलेली व्याख्याने कार्यशाळा आदींची माहिती देऊन प्रशिक्षणार्थींच्या सकारात्मक विकासासाठी पोषक वातावरण देण्याचे उद्देशाने प्रशिक्षण केंद्रात राबविण्यात येणारे उपक्रम पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. या समारोहाला प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश ख्वाजा, पोलिस महानिरीक्षक एच. सी. वाकडे, पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक तथा माजी प्राचार्य विजयकांत सागर, उपप्राचार्य सुभाष माकोडे, वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नयना पोहेकर यांच्यासह प्रशिक्षणार्थींचे पालक उपस्थित होते.
 
मुंबईचा संदीप सिरसाट बेस्ट प्रशिक्षणार्थी 
मुंबई शहर पोलिस दलातील प्रशिक्षणार्थी संदीप घैनिनाथ सिरसाट याने प्रथम क्रमांक पटकावला. संदीपने सर्वाधिक पारितोषिके मिळवले पोलिस महासंचालकाचे सन्मानचिन्ह फिरते चषक सुद्धा त्याला प्रदान करण्यात आले. दुसरा क्रमांक पुणे ग्रामीणचा सखाराम जनार्दन झुंबळ याने पटकावला. बाह्यवर्गातून रायगड येथील सदानंद विठ्ठल वाघमारे यांनी प्रथम क्रमांकासह महासंचालकांचे फिरते चषक पटकावले. तसेच द्वितीय क्रमांक पुणे लोहमार्गच्या रामरतन कपूरचंद रायमाने याने पटकावला. गोळीबारमध्ये प्रथम क्रमांक मुंबईच्या अक्षय अण्णासाहेब भंगळ याने तर कमांडो प्रशिक्षणाचा उत्कृष्ट पुरस्कार धुळेच्या धुरसिंग संदीप पाडवी याने पटकाला. 
 
बातम्या आणखी आहेत...