आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्तांची संख्या पोहोचली लाखात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका क्षेत्रातील चारही झोनमधील मालमत्तांची नोंद पूर्ण झाली आहे. नव्याने झालेल्या नोंद मोहिमेमुळे मालमत्तांची संख्या लाखात पोहोचली आहे. मालमत्तांच्या संख्येत २४ हजारांनी वाढ झाली आहे. या मालमत्तांमध्ये व्यावसायिक निवासी मालमत्तांचे विवरण तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही कोट्यवधी रुपयांनी वाढ होणार आहे.
महापालिका अस्तित्वात येऊन १५ वर्षांचा कालावधी झाला असताना मालमत्तांचे रिअसेसमेन्ट झालेले नव्हते. नियमानुसार दर चार वर्षांनी रिअसेसमेन्ट होणे गरजेचे होते. रिअसेसमेन्ट झाल्याने महापालिकेच्या महसुलातही वाढ झाली नव्हती. उपायुक्त माधुरी मडावी यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये रिअसेसमेन्टचे काम सुरू केले होते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिअसेसमेन्टचे काम पूर्ण झाले. रिअसेसमेन्टमुळे महापालिका क्षेत्रातील नव्याने झालेल्या मालमत्तांची नोंद घेता आली. यापूर्वी या मालमत्तांकडून कर वसूल केला जात नव्हता. तसेच ज्या मालमत्तांवर कर आकारला जात होता, त्या मालमत्तांमध्ये वाढीव बांधकाम केल्याची नोंदही झालेली नव्हती. आता या सर्व बाबींची नोंद झाली आहे. यापूर्वी महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या दप्तरी व्यावसायिक निवासी अशा ७३ हजार ८८१ मालमत्तांची नोंद होती. यात व्यावसायिक मालमत्तांची संख्या नऊ हजार ५३९, तर निवासी मालमत्तांची संख्या ६४ हजार ३४२ होती. आता मालमत्तांची संख्या ९७ हजार ८७४ झाली आहे. या मालमत्तांमध्ये किती मालमत्ता व्यावसायिक आहेत? याचे विवरण तयार करणे सुरू असून, त्याच बरोबर प्रभागनिहाय नळजोडण्यांची नोंदही वेगळी करण्याचे काम सुरू आहे. मालमत्तांच्या संख्येत २४ हजारांनी वाढ झाल्याने महापालिकेच्या मालमत्ता करातही वाढ होऊन महापालिकेचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

महसुलात दहा कोटींपेक्षा जास्त वाढ होण्याची अपेक्षा : यापूर्वी७३ हजार मालमत्तांच्या माध्यमातून महापालिकेला १८ कोटी ५० लाखांपर्यंत महसूल मिळत होता. आता मालमत्ता नळांच्या संख्येत वाढ होणार असल्याने किमान दहा ते पंधरा कोटी रुपयांनी मालमत्ता करात वाढ होण्याची शक्यता आहे. यातून कर्मचाऱ्यांची वर्षभराच्या वेतनाची सोय होणार नसली तरी वेतन खोळंबण्याचे प्रकार कमी होऊ शकतात.
झोननिहाय मालमत्तांची संख्या
नळांच्या संख्येतही वाढ होणार

महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरी एकूण नळजोडण्यांची संख्या २९ हजार ११४ आहे. मालमत्तांची संख्या २४ हजाराने वाढल्याने नळजोडण्यांची संख्याही एवढ्याच संख्येने वाढण्याची अपेक्षा आहे. रिअसेसमेन्ट करताना नळजोडण्या किती इंची आहेत? याचीही माहिती घेण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपट्टीच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

महासभेमुळे काम अडले
प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या कर आकारणी प्रणालीऐवजी रेडीरेकनरनुसार कर आकारणी करण्याचा प्रस्ताव महासभेकडे पाठवला आहे. परंतु, तीन महिने लोटूनही अद्याप महासभेने यावर निर्णय घेतलेला नाही. परिणामी, चालू आर्थिक वर्षाची कर आकारणी सध्या सुरू असलेल्या पद्धतीने सुरू केली आहे. परंतु, महासभेने वेगळा निर्णय घेतल्यास प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.