आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिपंप कनेक्शन देण्यासाठी १०३ कोटी रुपये मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील आढावा बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी चर्चा केली. - Divya Marathi
मुंबईतील आढावा बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी चर्चा केली.
अकोला- जिल्ह्यातधडक सिंचन योजनेंतर्गत सहा हजार ग्राहकांना कृषिपंप कनेक्शन देण्यासाठी १०३ कोटी रुपये तर अकोला शहरात भूमिगत केबल टाकण्यासाठी २४ कोटी रुपयांच्या निधीस ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २२ सप्टेंबर रोजी मंजुरी दिली. जिल्ह्याच्या पायाभूत विकास आराखड्यासाठी लागणाऱ्या निधीचे नियोजन करण्याचे निर्देशही या वेळी त्यांनी ऊर्जा विभागाला दिले आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ऊर्जामंत्री यांची भेट घेऊन कृषिपंप भूमिगत केबल टाकण्यासाठी निधी मिळावा म्हणून मंत्रालयात झालेल्या बैठकीत पाठपुरावा केला. या वेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओ. पी. गुप्ता तसेच महावितरण (अकोला)चे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे उपस्थित होते. जिल्ह्यात धडक सिंचन योजनेंतर्गत ३,१२६ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, १,८३६ लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे.

त्यामध्ये ९७७ लाभार्थ्यांना वीजपुरवठा देण्यात आला असून, अनामत रक्कम भरलेल्या १०७ लाभार्थ्यांना वीजपुरवठा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित लाभार्थ्यांना डिमांड दिली असून, त्यांनी अनामत रक्कम भरल्यानंतर त्यांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. कृषिपंप कनेक्शनसाठी ज्या ग्राहकांनी आवश्यक रकमेचा भरणा केलेला आहे अशा ८,४५७ कृषिपंपांचे ऊर्जीकरण प्रलंबित असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी ऊर्जामंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.

जिल्ह्यातील कृषिपंपांकरिता स्पेशल पॅकेज अंतर्गत १४ कोटी, स्पेशल पॅकेज अंतर्गत २० कोटी तर इन्फ्रा अंतर्गत ८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी जिल्ह्याला प्राप्त झालेला निधी अपुरा असून, त्यात वाढ करण्याची मागणीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या वेळी केली.

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषिपंप कनेक्शन देण्यासाठी तसेच विजेच्या समस्या सोडवण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन या वेळी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी पालकमंत्र्यांना दिले.