आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचे नियोजन कळल्यास शेतकरी खऱ्या अर्थाने साक्षर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाणीहा शेतीचा आधार आहे. त्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. पाऊस लांबल्यास पिकांची वाट लागते, अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याला पाण्याचे योग्य नियोजन कळले, तोच खऱ्या अर्थाने साक्षर झाला, असे मत जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले यांनी येथे व्यक्त केले.

अकोला ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागील १२ दिवसांपासून जिल्हाभर अजितपर्व-गतिमान, कृतिशील तथा प्रखर राष्ट्रवाद निर्माण अभियान राबवण्यात आले. या अभियानाचा समारोप आज, २२ जुलैला प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित अजित पवार अभीष्टचिंतन सोहळा जिल्हास्तरीय युवा किसान मेळाव्यात करण्यात आला. या किसान मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वसंतराव धोत्रे होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे, प्रा. विश्वनाथ कांबळे, अमोल मिटकरी, कृष्णा अंधारे, प्रा. विजय उजवणे, राजकुमार मूलचंदानी, दिलीप आसरे, प्रा. सरफराज खान, राजीव बोचे, हिदायत खाँ, प्रभाकर गावंडे, प्रा. प्रदीप वाघ, नीरज खोसला, डॉ. युसूफभाई, डॉ. आशा मिरगे, छाया कात्रे, सुशीला कातकर, ज्योती काकडे, सत्कारमूर्ती अमोल मिटकरी, प्रा. संतोष कुटे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकातून श्रीकांत पिसे पाटील यांनी अजितपर्व अभियानाची माहिती दिली. त्यानंतर कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. सुभाष टाले यांनी पाण्याचे नियोजन विशद करून सांगितले, तर डॉ. ए. एन. पासलवार यांनी कापूस शेतीची माहिती दिली. ते म्हणाले की, विदर्भात कापसाशिवाय पर्याय नाही. कपाशीचे बियाणे बिना पावसाचे २० ते २१ दिवस तग धरू शकते. मात्र, अलीकडे बीटी बियाण्यांचा पेरा वाढला आहे. बीटी बियाणे अत्यंत संवेदनशील असून, त्याला जास्त उष्णतामान, जास्त पाऊस सहन होत नाही. जगभरात संशोधित वाणामुळे कापसाचे उत्पादन वाढले. मात्र, आपल्याकडे अजून तसे चित्र नाही. शेतकऱ्यांनी कापसाबरोबर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, असे त्यांनी सुचवले. यानंतर उपस्थितांची समयोचित भाषणे झाली. अमोल मिटकरी, प्रा. संतोष कुटे, प्रा. विश्वनाथ कांबळे, कृष्णा अंधारे यांनी आपले विचार मांडले, तर अध्यक्षीय भाषणात वसंतराव धोत्रे यांनी परिणामांची तमा बाळगता स्पष्टवक्ता अजित पवार यांच्यासारखा नेता पुन्हा मिळवून देण्यासाठी तरुणाईला आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पिसे यांनी केले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलश बोदडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास युवावर्ग, महिला उपस्थित होत्या.

कास्तकारांसाठी झटणाऱ्यांना ‘अजितपर्व-मानकरी’ सन्मान
राष्ट्रवादीकाँग्रेसच्या वतीने युवा किसान मेळाव्यात कास्तकारांच्या जीवनात प्रकाशवाट निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना ‘अजितपर्व-मानकरी’ हा सन्मान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीने राज्यभरात प्रबोधन करणारे अमोल मिटकरी तसेच गरजू विद्यार्थ्यांना कमी शुल्कात, मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे प्रा. संतोष कुटे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्रीकांत पिसे यांनी त्यांच्या कार्याचा परिचय दिला.