आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत मिळणारे आधार कार्ड अकाेल्यामध्ये शंभर रुपयांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आधारकार्डच्या माध्यमातून नागरिकांना युनिक आयडेंटीफिकेशन नंबर देण्याची मोहीम जोमात असताना अनेक महा सेवा केंद्र संचालकांकडून मोफत आधार कार्ड काढून देण्यासाठी १०० रुपये घेतल्या जात आहे. एक आधार कार्ड काढण्यासाठी लागणाऱ्या विलंबाचा हा पैसा असल्याची बतावणी महा सेवा केंद्र संचालकांकडून केली जात आहे. यामुळे शासनाच्या आधार कार्डच्या मोहिमेत खोळंबा निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेत कारवाई करणे अपेक्षित आहे.
राज्य केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आधार कार्ड नोंदणीसाठी गर्दी होत आहे. मात्र, त्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागातील महा सेवा केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नसल्याची खंत आहे. आधार कार्ड नोंदणीसाठी प्रशासनाकडून कोणतीही मोहीम या वर्षी राबवली गेली नाही. त्यामुळे अद्यापही ३० टक्के जनता आधार कार्डपासून वंचित आहे.

२०१३-१४ मध्ये काढण्यात आलेल्या अनेक नागरिकांना अद्यापही आधार कार्ड मिळालेले नसल्याची ओरड होत आहे. महा सेवा केंद्र संचालकांकडून या नागरिकांचे कुठलेही समाधान होत नसल्याचे दिसून येते. उलट ते आमचे काम नाही, असे म्हणून दिल्लीकडे बोट दाखवल्या जात आहे. गॅस सिलिंडर ग्राहक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्राची मागणी बस वाहकांकडून केली जात आहे. परिणामी, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी आधार कार्ड काढण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.
आधार कार्ड नोंदणी केंद्र मर्यादित असल्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन अकोला शहरासह अन्य ठिकाणी ग्रामीण भागात १०० ते ३०० रुपयांपर्यंत जादा रक्कम वसूल केली जात आहे. शहरात मोजकेच आधार नोंदणी केंद्र सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची नितांत गरज भासत असल्यामुळे नाइलाजास्तव नागरिकही या कार्डसाठी आर्थिक तोटा सहन करत आहेत. श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी

आधार कार्ड मोफत काढून द्यावे
आधार कार्ड काढून देणे ही प्रत्येक महा सेवा केंद्र संचालकांची नैतिक जबाबदारी आहे. सर्व महा सेवा केंद्रांवर आधार कार्ड काढण्याची सुविधा मोफत आहे. कुणीही पैसे देऊ नयेत. नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी पैशाची मागणी होत असल्यास तक्रार करावी. त्याविरुद्ध निश्चित कारवाई केली जाईल.

महा सेवा केंद्र संचालकांची बैठक
आधारकार्ड काढण्याचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी महा सेवा केंद्र संचालकांची तातडीची बैठक २२ सप्टेंबर रोजी घेतली. या बैठकीत लवकर १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी देशपांडे यांनी दिले.

अकोल्यात फक्त एकच केंद्र सुरू
आधारकार्ड काढण्यासाठी न्यू तापडियानगरातील महा सेवा केंद्रात आधार कार्ड काढून दिले जात आहे. इतर सहा महा सेवा केंद्रांच्या ठिकाणी पैशाशिवाय आधार कार्ड देण्यासाठी नाक मुरडले जात आहे. सातही महा सेवा केंद्रांत ही सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

आधार कार्डची शिबिरे घ्यावीत
नागरिकांचीहोणारी तारांबळ थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावनिहाय शिबिरे आयोजित करावीत. याशिवाय शहरातील प्रत्येक महा सेवा केंद्रात आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

टक्केवारी
८७.६३ %
आधार नोंदणी
१५,९०,४३४
लोकसंख्या
१८,१३,६१७