आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची हद्दवाढ जानेवारीनंतर, भौरदचा मात्र यादीमध्ये नाही समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिका अस्तित्वात आल्यापासून रखडलेल्या हद्दवाढीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. साधारणपणे जानेवारीनंतर महापालिकेची हद्दवाढ अटळ असल्याची माहिती मिळाली आहे. महापालिका क्षेत्रालगत असलेल्या २१ गावांचा समावेश महापालिकेत होईल.
परंतु, या गावांच्या यादीत महापालिका हद्दीला लागून असलेल्या भौरदचा समावेश नाही, तर महापालिका क्षेत्रापासून अडीच किलोमीटर दूर असलेल्या डाबकी गावाचा मात्र समावेश आहे. त्यामुळे हद्दवाढ झाल्यानंतर डाबकीला भौरद मार्गेच सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. यामुळे हद्दवाढीत भौरद वांधा ठरणार आहे.
ऑक्टोबर २००१ ला महापालिका अस्तित्वात आली. त्या वेळी केवळ नगरपालिका क्षेत्रालाच महापालिका क्षेत्र करण्यात आले. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अनुपकुमार यांची महापालिकेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकीय कार्यकाळात अनुपकुमार यांनी महापालिका क्षेत्रालगतची २१ गावे महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावास काही ग्रामपंचायतींनी विरोध केला होता. परंतु, न्यायालयात कोणीही याचिका दाखल केली नव्हती. गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव धूळ खात पडून होता. आतापर्यंत आलेल्या काही आयुक्तांनी त्यांच्या कार्यकाळात हद्दवाढीसाठी प्रयत्न केले होते, परंतु हद्दवाढ झाली नाही. आता मात्र पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी स्वत: पुढाकार घेतल्याने पुन्हा एकदा हद्दवाढीची चर्चा सुरू झाली आहे. जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची हद्दवाढ निश्चित मानली जात आहे.

१५ वर्षांत हद्दवाढीचे प्रस्ताव अनेकदा शासनाकडे सादर झाले, त्यावर चर्चाही झाली. मात्र, महापालिकेच्या हद्दवाढीत महापालिका क्षेत्राला चिकटून असलेल्या भौरद गावाचा समावेश नाही, ही बाब अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याच्या लक्षात आलेली नाही. विशेष म्हणजे भौरद ग्रामपंचायतची हद्द महापालिका क्षेत्राला लागून आहे. तर, या यादीत समावेश असलेले डाबकी गाव महापालिका क्षेत्रापासून साधारणपणे अडीच किलोमीटर दूर आहे. अडीच किलोमीटर दूर असलेल्या गावाचा समावेश होतो, तर महापालिका क्षेत्राला चिकटून असलेल्या भौरद गावाचा समावेश नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला नाही? तसेच हद्दवाढ झाल्यास भौरद गावाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भौरदवासीयमहापालिकेवरच अवलंबून : भौरदगावाची लोकसंख्या २८ हजार आहे. मूळ भौरद गावापेक्षा महापालिका क्षेत्रालगत असलेल्या भौरदच्या हद्दीत लोकसंख्येचे प्रमाण ७० टक्के आहे. हे सर्व भौरदवासीय महापालिकेच्याच मूलभूत सोयीसुविधांचा वापर करतात. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून भौरद ग्रामपंचायतला येत्या काही महिन्यात पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे हद्दवाढ होऊनही भौरदवासीयांचा भार महापालिकेला सोसावा लागणार आहे.
दीडलाखाने लोकसंख्या वाढणार : महापालिकेचीहद्दवाढ झाल्यास अकोला शहराच्या लोकसंख्येत दीड लाखाने वाढ होईल. तूर्तास २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या साडेचार लाख आहे. ती सहा लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे.

सोयीसुविधाहीपुरवाव्या लागणार :
महापालिकाक्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या अनेक गावांमध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नाहीत. त्यामुळे या सर्व गावांना पाणीपुरवठा करण्याचे आव्हान महापालिकेला पेलावे लागणार आहे. त्याचबरोबर रस्ते, पथदिवे, साफसफाई, आरोग्य सेवा, सार्वजनिक स्वच्छतागृह आदी विविध सुविधाही पुरवाव्या लागणार आहेत.

पुन्हाद्राविडी प्राणायम :
हद्दवाढकरताना भौरद गावाचा समावेश महापालिकेला करावाच लागणार आहे. अन्यथा समावेश झालेल्या डाबकी गावाला सोयीसुविधा पुरवणे एक आव्हान ठरणार आहे. त्यामुळे भौरद गावाचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यासाठी पुन्हा महासभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा लागेल किंवा हद्दवाढीचा प्रस्तावच नव्याने तयार करून पाठवावा लागणार आहे. परिणामी, १५ वर्षांनंतरही हद्दवाढीसाठी कागद काळे करावे लागण्याची शक्यता आहे.

यागावांचा होईल मनपामध्ये समावेश : सिलोडा,अकोली खुर्द, डाबकी, सोमठाणा, खरप, वाकापूर, अकोली बुद्रूक, शिवापूर, शिवणीचा काही भाग, उमरी प्रगणे बाळापूर, उमरी प्रगणे अकोला, नायगाव, मलकापूर, िनझामपूर, हिंगणा, गुडधी, अकोला, शिवार, उमरखेड, तपलाबाद, खडकी या गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश होणार आहे.

२.५ किलोमीटर दूर असलेल्या डाबकी गावाचा समावेश महापालिकेत करण्यात येणार अाहे.
हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवू

^भौरदगावाचासमावेश करण्यासाठी प्रस्ताव महासभेकडे पाठवू, महासभेने मंजूर केल्यानंतर तो शासनाकडे पाठवला जाईल.'' अजय लहाने, आयुक्तमहापालिका

भौरदचा विसर का?
हद्दवाढीच्या गावांमध्ये भौरदचा समावेश का नाही, किंवा विसर का पडला? हा प्रश्न दिव्य मराठीने अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर अधिकारीही बुचकळ्यात पडले. परंतु, भौरद गावाचा विसर का पडला? हाच मुळात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता अधिकारी याबाबत डोके खाजवत आहेत.

डाबकीला सुविधा कशा पुरवणार?
भौरद गावातूनच डाबकी गावाला जावे लागते. हद्दवाढ झाल्यानंतर डाबकी गावाला सोयीसुविधा पुरवाव्या लागणार आहे. भौरद गावाचा समावेश हद्दवाढीत असता तर भौरद ते डाबकी अशी सुविधा पुरवणे शक्य होते. त्यामुळे पाणीपुरवठा, पथदिवे आदी सुविधा डाबकी शहराला कशा पुरवणार, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.